नाशिक : नाले सफाईची कामे योग्य प्रकारे न झाल्याने आणि दैनंदिन साचणाऱ्या फुले, भाजीपाल्याच्या कचऱ्यामुळे दरवर्षी मुसळधार पावसात पाण्याखाली जाणाऱ्या सराफ बाजार, भांडीबाजार, कापड बाजार, दहीपूल आणि सभोवतालच्या परिसरात या वर्षी पुन्हा तशी स्थिती उद्भवू नये म्हणून महापालिकेने विशेष स्वच्छता मोहीम राबविली. त्या अंतर्गत रस्ते सफाई, परिसरातील नाल्यांच्या जाळ्याही साफ करण्यात आल्या. या मोहिमेत दीड टन कचरा संकलित करण्यात आला. या मोहिमेचे यशापयश मुसळधार पावसात पाण्याचा निचरा होतो की नाही, यावर निश्चित होणार आहे.
पावसाळ्यात दरवर्षी सराफ बाजार आणि सभोवतालच्या परिसरात पाणी तुंबण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. या भागातून जमिनीखालून सरस्वती नाला वाहतो. त्याची स्वच्छता होत नसल्याने पाणी तुंबते. परिसरात फुल आणि भाजी बाजार भरतो. शेकडो विक्रेते रस्त्यावर बसून मालाची विक्री करतात. व्यापारी पेठेत पाणी शिरून दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. या प्रश्नाकडे अलीकडेच सराफ व्यावसायिकांच्या संघटनेने लक्ष वेधले होते.
पावसाळ्याच्या तोंडावर, मनपाच्या पश्चिम विभागाच्यावतीने सराफ बाजार आणि परीसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सराफ बाजारासह मेनरोड, बोहोर पट्टी, दहिपूल, हुंडीवाला लेन, चांदीचा गणपती, रविवार कारंजा ते गाडगे महाराज पूल परिसरात रस्ते सफाई करण्यात आली. घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. कल्पना कुटे, विभागीय अधिकारी नितीन नेर, स्वच्छता निरीक्षक संजय आर. गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
हेही वाचा >>> नाशिक : दिवसाही पोलिसांची शोध मोहीम; बेसावध गुन्हेगारांना धक्का, १५४ सराईतांवर कारवाई
पावसाळ्यापूर्वी विशेष साफसफाई मोहीम करावी, अशी मागणी सराफ बाजार असोसिएशन, कापड बाजार, भांडीबाजार असोसिएशन यांनी महानगरपालिकेकडे केली होती. त्यानुसार ही मोहीम राबविण्यात आली. दरवर्षी या भागात या प्रकारे स्वच्छता मोहीम राबविली जाते. नाल्यांची साफसफाई केल्याचे दावे होतात. मात्र मुसळधार पाऊस झाला की, या बाजारपेठा दुर्गंधीयुक्त गटारीच्या पाण्याने वेढल्या जातात. यंदा साफसफाईचे दावे मनपाने केले असले तरी पावसात पाण्याचा निचरा झाल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवता येईल, अशी स्थानिक व्यावसायिकांची भावना आहे.
फेरीवाल्यांवर कारवाई कधी ?
दररोज फेकला जाणारा फुल आणि कृषी मालाचा कचरा, प्लास्टिक पिशव्यांमुळे नाले तुंबतात आणि त्यातील पाणी सराफ बाजार व आसपासच्या भागात शिरून मोठे नुकसान होते. नाले सफाई व परिसरातील अतिक्रमणे, रस्त्यावर अनधिकृतपणे ठाण मांडणारे फेरीवाले यांच्यावर कारवाईसाठी नाशिक सराफ व्यावसायिकांच्या संघटनेने काही दिवसांपूर्वी महापालिकेला साकडे घातले होते. नाले स्वच्छतेबाबत ठोस उपाय योजना करावी आणि फुल, भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. – गिरीश नवासे (अध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन)