जिल्ह्य़ातील गड, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानच्यावतीने श्रमदान मोहीम यावेळी पेठ तालुक्यातील सोनगीर किल्ल्यावर राबविण्यात आली. या मोहिमेसोबतच गावातील गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच पक्षी वाचविण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात आले. यावेळी उपस्थितांना किल्ल्यावरील जैव विविधतेची माहिती देण्यात आली. दरम्यान, किल्ल्याच्या सभोवताली असलेल्या जीवनमानाचा अभ्यास करत पर्यटनावर भर दिला तर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणाऱ्या किल्ला संवर्धनातील हा २९ वा किल्ला आहे. पेठ तालुक्यात सोनगीर असा किल्ला आहे हे अनेकांना अद्याप माहीत नाही. सह्य़ाद्रीच्या रांगेवरील पेठच्या उपरांगेत हा किल्ला असून भुवन गावापासून त्याची चढाई सुरू होते. सोनगीरच्या माथ्यावर एक तलाव आहे. शेंदुर लावलेल्या तीन माऊल्या या ठिकाणी पर्यटकांचे स्वागत करतात. पठारावर तटबंदीच्या खूणा असून शत्रुपक्षावर लक्ष ठेवण्याचे काम हा किल्ला करीत असावा. जैव विविधतेने नटलेला हा परिसर असून किल्ल्यावर करवंदे, आवळ्यांची झाडे दृष्टिपथास पडतात. या ठिकाणी दुर्मीळ सापसुरळी पहावयास मिळाली. या परिसरात आजूबाजुच्या गावकऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. तरीदेखील वन विभागाचा कोणी कर्मचारी या ठिकाणी दिसत नाही. श्रमदान मोहिमेतून किल्ल्यावर जलस्त्रोत अर्थात तळी स्वच्छ करण्यात आली. जमा झालेला पाला-पाचोळासह अन्य काही कचराही गोळा करण्यात आला. श्रमदानानंतर प्रतिष्ठानने किल्ल्याच्या जवळपास असलेल्या पाडय़ांवरील शालेय विद्यार्थ्यांना वह्य़ा, पेन्सिल, रंगपेटी, पेन, शार्पनर यासह अन्य काही शैक्षणिक साहित्य दिले.
मोहिमेच्या दुसऱ्या टप्पात ग्रामस्थांना पक्षी बचाव अभियानाबाबत प्रबोधन करण्यात आले. पिंजऱ्यातील पोपटांना मुक्त करून निसर्गात सोडून देण्याची विनंती करण्यात आली. पोपट व इतर पक्षी पाळणे कायद्याने गुन्हा असून पंचवीस हजार रुपये दंड होवू शकतो अशी माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनी अभियानाचे स्वागत करत पिंजऱ्यात बंदीस्त पोपट सोडून दिले. यावेळी शिंगाळी पाडय़ावरील रामू दरोडे या कलावंताने आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवीत घोडय़ाचे नृत्य केले. विशेष म्हणजे दीड फुटाच्या लाकडाच्या दांडक्यावर उभे राहत त्याने केलेल्या नृत्याने सर्वाचे लक्ष वेधले. आदिवासी कला जिवंत रहावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे रामुने सांगितले. किल्ल्याच्या पायथ्याशी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले तर पर्यटकांची गर्दी वाढेल आणि स्थानिकांना रोजगार देखील उपलब्ध होईल. यासाठी पुरातत्व विभाग आणि वन खात्याने लक्ष देणे गरजेचे आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा, रामदास भोये, भीमराव राजोळे, सागर बनकर आदी उपस्थित होते.



