नाशिक : एनआरसी, सीएए तसेच इव्हीएम विरोधात बुधवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने दिलेल्या भारत बंद हाकेला शहरासह जिल्ह्य़ात संमिश्र प्रतिसाद लाभला. शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेत दुपारी काही काळ शुकशुकाट होता. दुसरीकडे, बंदच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना काही काळ वाहतुक कोंडीला तोंड द्यावे लागले.

बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने शालिमार येथून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा गंजमाळ येथून पुन्हा शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी केली. मोर्चात एमआयएमचे मुख्तार शेख, जावेद शेख, डॉ. प्रशिक घनसावंत आदींसह वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चामुळे शालिमार परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले गेले. दुसरीकडे अन्य ठिकाणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने जाहीर केलेल्या दुकान बंद ठेवण्यापेक्षा काळी पट्टी लावत निषेध नोंदविण्यात आला. शाळा, महाविद्यालयांसह सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहिल्याने शहरात अन्य ठिकाणी बंदचा मागमूसही जाणवला नाही.

जिल्ह्य़ात मनमाड येथे दुकाने  बंद राहिली. भारतीय संविधान बचाव समितीच्या वतीने शहर परिसरातून मोर्चा काढण्यात येऊन एकात्मता चौकात निदर्शने करण्यात आली.र्   एनआरसी आणि सीएए विरोधात शहरातील दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने बंद असल्याने गजबजलेल्या रस्त्यांवर शुकशुकाट होता. महात्मा फुले चौकातून मोर्चा काढण्यात आला. एकात्मता चौकात मोर्चाचा समारोप झाला. यावेळी प्रमुख मौलांनासह गंगाभाऊ त्रिभुवन, अरूण केदारे, एम. डी. पगारे आदी उपस्थित होते.