जळगाव : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड समोर आली असून जागतिक स्तरावरील शीतपेय क्षेत्रातील आघाडीची कंपनी कोका-कोलाने जामनेर औद्योगिक वसाहतीत नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्याच्या हालचाली वाढवल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या उपाध्यक्षांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने जामनेर एमआयडीसीला भेट देत प्रस्तावित प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सुमारे जागेची पाहणी केली. त्यामुळे जामनेरसह जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोका-कोला कंपनीकडून नवीन उत्पादन युनिट उभारण्यासाठी जामनेरमध्ये मोठ्या भूखंडाचा शोध घेतला जात आहे. त्याच अनुषंगाने कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जामनेर औद्योगिक क्षेत्रातील उपलब्ध मोठ्या भूखंडांची पाहणी केली. एमआयडीसीकडून पायाभूत सुविधांनी सज्ज असलेल्या मोठ्या भूखंडांची माहिती कंपनीच्या पथकाला देण्यात आली. यापैकी तीन मोठ्या भूखंडांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. शीतपेय निर्मिती उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे कंपनीच्या तांत्रिक पथकाने केवळ भूखंडांची पाहणी न करता जामनेर औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाची तसेच जॅकवेलच्या प्रस्तावित जागेचीही पाहणी केली. प्रकल्पाच्या भविष्यातील पाण्याची गरज, उपलब्धता आणि पाणीपुरवठ्याची क्षमता याबाबत तांत्रिक पातळीवर माहिती घेण्यात आली.

४६९ हेक्टर क्षेत्रात ५७३ भूखंड

जामनेर औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसीने तब्बल ४६९ हेक्टर जमीन संपादित केली आहे. या क्षेत्रात विविध आकारमानाचे एकूण ५७३ भूखंडांचे आरेखन करण्यात आले आहे. त्यापैकी पायाभूत सुविधांनी सज्ज असलेले नऊ मोठे भूखंड सध्या एमआयडीसीच्या मिलाप प्रणालीद्वारे वाटपासाठी उपलब्ध आहेत. उर्वरित भूखंडांवर पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम सुरू आहे. मोठ्या भूखंडांची उपलब्धता, पाणीपुरवठ्याची व्यवस्था आणि औद्योगिक पायाभूत सुविधांच्या दृष्टीने जामनेर औद्योगिक क्षेत्र कंपनीसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोका-कोलाच्या पथकाने पाहणी केलेल्या तीन भूखंडांपैकी कोणत्या जागेची अंतिम निवड होते, याकडे आता औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

मोठ्या गुंतवणुकीची शक्यता

कोका-कोलासारखी बहुराष्ट्रीय कंपनी जामनेरमध्ये आली तर या परिसराच्या औद्योगिक नकाशावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. मोठ्या उद्योगाच्या पाठोपाठ पॅकेजिंग, वाहतूक, गोदामे, देखभाल-दुरुस्ती, लॉजिस्टिक्स, अन्नप्रक्रिया, सेवा आणि इतर विविध क्षेत्रांतील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना संधी उपलब्ध होऊ शकतात. मोठ्या उद्योगाच्या माध्यमातून प्रत्यक्ष रोजगाराबरोबरच अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीही वाढण्याची अपेक्षा आहे. स्थानिक युवकांना विविध तांत्रिक, उत्पादन, व्यवस्थापन, वाहतूक आणि सेवा क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे जामनेर तसेच परिसरातील औद्योगिक आणि आर्थिक व्यवहारांना चालना मिळण्याची शक्यता आहे.

जामनेरकडे उद्योगांचे लक्ष वेधले

जामनेरमध्ये कोका-कोलासारख्या आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपनीचा प्रकल्प उभारला गेल्यास इतर उद्योगांसाठीही या औद्योगिक क्षेत्राची विश्वासार्हता वाढू शकते. मोठ्या कंपनीच्या आगमनामुळे पुरवठा साखळीशी संबंधित उद्योगांना स्थानिक पातळीवर व्यवसायाच्या संधी निर्माण होतील. परिणामी भविष्यात जामनेर एमआयडीसीकडे आणखी मोठ्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आकर्षित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एमआयडीसीकडून उद्योजकांना प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे कोका-कोलाच्या प्रस्तावामुळे जामनेर औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या अधिकाऱ्यांची उपस्थिती

कोका-कोला कंपनीचे उपाध्यक्ष एन. शशीधर, नॅशनल हेड श्रीनिकेत झा, बालकृष्ण, पवन कोठाळे, विवेक तिवारी यांच्यासह एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शंकर बर्गे, प्रादेशिक अधिकारी दीपाली रासवे आदी अधिकारी पाहणीवेळी उपस्थित होते. कोका-कोलाच्या पथकाने केलेली जागा, पाणी आणि वीज सुविधांची पाहणी ही प्रकल्पाच्या संभाव्य उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाची प्राथमिक पायरी मानली जात आहे. मात्र, प्रकल्पासाठी अंतिम भूखंड निवड, गुंतवणुकीचा आकार, उत्पादन क्षमता आणि प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीचा कालावधी याबाबत अधिकृत अंतिम निर्णय अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे पुढील टप्प्यात कंपनी आणि एमआयडीसी यांच्यातील चर्चेकडे जामनेरकरांचे लक्ष लागले आहे.