जळगाव : दावोस (स्वित्झर्लंड) येथील जागतिक पातळीवरील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर थेट परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक आणि प्रभावी प्रयत्न केले. या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम म्हणून प्रसिद्ध शीतपेय कंपनी कोका-कोलाचा प्रकल्प जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोस (स्वित्झर्लंड) येथील जागतिक पातळीवरील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये विविध आंतरराष्ट्रीय उद्योग समूहांच्या प्रमुखांशी थेट संवाद साधत महाराष्ट्रातील उद्योग स्नेही धोरणे, मजबूत पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली. या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोका-कोला कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मायकल गोल्टझमन यांची भेट घेऊन जामनेर येथील प्रस्तावित प्रकल्पावर सविस्तर चर्चा केली. या चर्चेत प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, गुंतवणुकीचा आराखडा, रोजगार निर्मिती आणि स्थानिक विकास यासह विविध मुद्द्यांवर सकारात्मक सहमती झाली. तसेच प्रकल्पावर अधिकृतपणे शिक्कामोर्तबही करण्यात आले.

नव्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात नाशिक विभागातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून, एकूण सात लाख ३० हजार १०० कोटी रुपयांची गुंतवणूक नाशिक विभागात होणार आहे. या भरीव गुंतवणुकीपैकी एक महत्त्वाचा आणि चर्चेचा कोका-कोला प्रकल्प जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात साकारणार आहे. त्यामुळे जामनेर तालुका औद्योगिक नकाशावर ठळकपणे समोर येणार आहे. या ऐतिहासिक निर्णयावर प्रतिक्रिया देताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी समाज माध्यमावर “ऐतिहासिक दिवस : जामनेरच्या औद्योगिक विकासाची ‘दावोस’मध्ये मुहूर्तमेढ”, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. कोका-कोला सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीचा प्रकल्प जामनेरमध्ये येणे ही संपूर्ण तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. तालुक्यातील अनेक तरुणांना स्थानिक पातळीवरच हक्काचा रोजगार मिळणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दावोस येथील बैठकीनंतर कोका कोला प्रकल्प जामनेर तालुक्यात प्रत्यक्षात आकारास आल्यावर केवळ औद्योगिक विकासच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे. मोठ्या प्रमाणावर थेट व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. वाहतूक, लॉजिस्टिक्स, पॅकेजिंग, सेवा उद्योग यांसारख्या पूरक क्षेत्रांनाही चालना मिळणार आहे. तसेच या प्रकल्पाच्या निमित्ताने रस्ते, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, दळणवळण आणि इतर मूलभूत पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होणार आहे. याचा लाभ स्थानिक नागरिक, शेतकरी आणि लघु उद्योजकांनाही मिळणार आहे. एकूणच, दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील या यशस्वी चर्चांमुळे महाराष्ट्रात गुंतवणुकीचा नवा अध्याय सुरू होत असून, जामनेर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे.