नाशिक – नवी दिल्लीतील जंतर मंतरवर जबरदस्त आंदोलन करुन केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला हादरविणारी कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)आता आपला विस्तार करु लागली असून त्यादृष्टीने नाशिक जिल्हाही त्यांच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळेच नाशिक जिल्ह्यातही जेन झी वर्गाला आकर्षित करण्यासाठी काॅक्रोच जनता पार्टी आता धडक देण्याच्या तयारीत आहे. विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने विषयांना गती देण्यासंदर्भात नाशिक येथील शासकीय विश्रामगृहातील गार्डन येथे झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. आपल्या अनोख्या आंदोलनाच्या शैलीमुळे आणि माघार न घेण्याच्या भूमिकेमुळे अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील काॅक्रोच जनता पार्टी जगभर प्रसिध्द झाली आहे.

विशेषत्वाने युवावर्गात सीजेपीविषयी कमालीचे आकर्षण आहे. ‘सीजेपी’ने आता महाराष्ट्रात आपले जाळे पसरविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक येथे झालेल्या बैठकीत चळवळीच्या आगामी सामाजिक उपक्रमांसह विविध जनहिताच्या प्रश्नांवर आणि संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक जिल्ह्यासह राज्यातील सरकारी शाळांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी शाळांचे सर्वसमावेशक ऑडिट कोणत्या पद्धतीने करावे, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. शाळांमधील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वर्गखोल्या, शैक्षणिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या मूलभूत सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी, नोंदणी आणि वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याच्या प्रक्रियेवरही विचारमंथन झाले.

‘सीजेपी’ आंदोलनांबाबत जनप्रतिक्रिय

कॉक्रोच जनता पार्टीच्या विविध सामाजिक व जनहिताच्या प्रश्नांवरील आंदोलनांना नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद, स्थानिक पातळीवरील जनसमर्थन तसेच आगामी काळातील आंदोलनांची दिशा यावरही नाशिकच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात संघटनेची ताकद वाढविणे, नवीन कार्यकर्त्यांना चळवळीच्या सामाजिक कार्याशी जोडणे, तालुका व स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करणे तसेच आगामी सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांचे नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली. येत्या काळात लवकरच सीजेपी प्रमुख अभिजीत दिपके आणि राष्ट्रीय संघटनमंत्री अजिंक्य शिंदे हे देखील नाशिक दौरा करतील, अशी माहिती देण्यात आली आहे.

या बैठकीस कॉक्रोच जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटनात्मक सहसचिव अक्षय शिंदे, पश्चिम विभाग समन्वयक ॲड. जयसिंग शेरे, डॉ. नितीन दिघे, तसेच क्षितिज पगार, प्रज्वल कसबे, सागर स्वामी, धवल, सम्राट सोनावणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील ॲड. अभिजीत गोसावी, रमेश देवगिरे, स्वप्निल घिया यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थित राहून विविध विषयांवर आपली मते मांडली. बैठकीत ‘स्कूल ठीक करो’ अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सरकारी शाळांची वस्तुनिष्ठ पाहणी व सर्वसमावेशक ऑडिट करण्यासोबतच नाशिक जिल्ह्यात सीजेपीची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्धार करण्यात आला.