जळगाव : पश्चिम रेल्वेच्या जळगाव ते उधना मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असून गाडी क्रमांक ०६१८१/०६१८२ कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी एक्स्प्रेस १३ ऑगस्टपासून पुन्हा धावणार आहे. या गाडीचा धरणगाव रेल्वे स्थानकावरही थांबा देण्यात आला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारताकडे प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त ठरेल. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ही रेल्वे पुन्हा सुरू होत असल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
धरणगाव येथे कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला अधिकृत थांबा मिळावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून स्थानिक प्रवाशांकडून केली जात होती. धरणगाव तालुका प्रवासी मंडळानेही यासाठी रेल्वे प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने देऊन पाठपुरावा केला. प्रवाशांची वाढती संख्या, राजस्थानकडे जाणाऱ्या व्यापाऱ्यांची गरज तसेच दक्षिण भारताशी वाढणारा संपर्क लक्षात घेऊन ही मागणी सातत्याने लावून धरली होती. प्रवाशांच्या मागणीला खासदार स्मिता वाघ यांनी देखील रेल्वे मंत्रालय आणि वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडे प्रभावीपणे मांडत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांनंतर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत विशेष एक्स्प्रेसला धरणगाव स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर केला.
असे असेल धरणगावचे वेळापत्रक
गाडी क्रमांक ०६१८१ कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस प्रत्येक शुक्रवारी दुपारी २ वाजून ५८ मिनिटांनी धरणगाव स्थानकावरून जयपूरच्या दिशेने प्रस्थान करेल. तर गाडी क्रमांक ०६१८२ जयपूर–कोयंबतूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस प्रत्येक सोमवारी सायंकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी धरणगाव स्थानकावर येऊन कोयंबतूरच्या दिशेने रवाना होईल. दोन्ही बाजूने धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक लक्षात घेता प्रवाशांना राजस्थानसह दक्षिण भारताकडे जाणे सोयीचे ठरणार आहे.
राजस्थानकडे जाण्यासाठी थेट सुविधा
धरणगाव स्थानकावरून जयपूरसह राजस्थानातील इतर शहरांकडे जाण्यासाठी उपलब्ध असणारी ही एकमेव थेट रेल्वे सेवा आहे. त्यामुळे प्रवाशांना जळगाव, भुसावळ किंवा इतर मोठ्या स्थानकांवर जाऊन रेल्वे बदलण्याची गरज राहणार नाही. राजस्थानमध्ये व्यवसाय, शिक्षण, नोकरी किंवा कौटुंबिक कारणांसाठी जाणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे कोयंबतूरमार्गे तामिळनाडू व दक्षिण भारतातील इतर शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही ही रेल्वे सोयीची ठरणार आहे. विशेष रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभार धरणगाव तालुका प्रवासी मंडळाने मानले आहेत. तसेच पाठपुरावा करून गाडीचा थांबा निश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खासदार स्मिता वाघ यांचेही आभार मानण्यात आले आहेत. धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष तथा डीआरयूसीसी सदस्य (पश्चिम रेल्वे, मुंबई सेंट्रल विभाग) महेंद्र कोठारी यांनी अधिकाधिक नागरिकांनी या रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
