शेतमालाची साठवणूक करणे आणि योग्य दर मिळाल्यावर शेतकऱ्यांना माल विकता यावा यासाठी रेल्वेच्या सहकार्याने महाराष्ट्रात शीतगृहांची साखळी निर्माण करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. देशात उभारण्यात येणाऱ्या २२७ पेकी ५२ शीतगृहे एकटय़ा महाराष्ट्रात उभारले जात असून त्यापैकी २५ पूर्ण होत आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शीतगृहांसाठी वीज दरात सवलत देण्याचा राज्य शासनाचा विचार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी वीज, पाणी आणि बाजारपेठ या त्रिसूत्रीच्या आधारे काम करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्य़ातील लासलगाव येथे रविवारी भारतीय रेल्वे व लासलगांव विभाग सहकारी खरेदी विक्री संघ यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय शीतगृहाच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्र्यांनी शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी करीत असलेल्या योजनांची माहिती दिली. कांद्याचे भाव वाढले आणि पडले तरी सत्ताधाऱ्यांनाच त्रास होतो. कांद्याची बाजारपेठ शेतकऱ्यांच्या हातात राहण्यासाठी शेतमालाची साठवणूक करणे आणि योग्य दर मिळाल्यावर विकता यावे यासाठी शीतगृहांची व्यवस्था उपयोगी ठरू शकेल. रेल्वेच्या माध्यमातून विदर्भात २१ हजार कोटींचे, मराठवाडय़ासाठी १९ हजार कोटी आणि उत्तर महाराष्ट्रात २२ हजार कोटींचे प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. राज्यात एकूण एक लाख कोटींचे प्रकल्प रेल्वेच्या सहकार्याने उभारण्यात येणार आहेत. द्राक्षे, डाळिंब, आंबा निर्यातीत वाढ झाली आहे. टोमॅटो केचअप प्रक्रिया उद्योगासाठी जपानी कंपनीसोबत करार करण्यात आला असून त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनाला हमी भाव मिळू शकेल. शेतकऱ्याला अखंडित वीज पुरवठा होण्यासाठी शासनाने सोलर फिडर सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. नाशिकसह मराठवाडय़ातील पाणी प्रश्न मिटविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपायांचीही त्यांनी माहिती दिली. नार-पार खोऱ्यातून गिरणा खोऱ्यात १० टीएमसीपेक्षा अधिक पाणी आणण्यात येणार असून त्यासाठी साडेचार हजार कोटी रूपयांचा खर्च होणार आहे. पार खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात आणण्यात येणाऱ्या पाण्यापैकी तीन टीएमसी पाणी पालखेड समूहात येणार आहे. तसेच दरसवाडी पोहोच कालव्यास त्यामुळे अधिक पाणी उपलब्ध होईल. दमणगंगामधून गोदावरी खोऱ्यात २५ ते ३० टीएमसी पाणी येणार असल्याने पाण्याची तूट संपुष्टात येईल. दमणगंगा-एकदरे-गंगापूर योजनेतून पाच टीएमसी आणि वैतरणा-दमणगंगा-कडवा योजनेतून ७.३ टीएमसी पाणी मिळणार असल्याने खानदेश आणि मराठवाडय़ासाठी या  योजना उपयुक्त ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी मुख्यमंत्री फडणवीस हे शेतकरी हिताला प्राधान्य देत असून शेतकऱ्यांविषयी बोलणारे अनेक असले तरी काम करणारे फडणवीस आणि मोदीच आहेत, असे नमूद केले. शेतकऱ्यांनी आता संघर्ष नव्हे, तर हर्ष करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचा माल प्रRिया करुन बाजारात नेण्यासाठी कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून राज्याला सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. कामायनी एक्स्प्रेसला लासलगांव येथे थांबा देण्याची घोषणाही त्यांनी केली.

यावेळी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदा व पालकमंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खा. हरिश्चंद्र चव्हाण, आ. सीमा हिरे, लासलगाव खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नानासाहेब पाटील आदी उपस्थित होते.