नाशिक: उन्हाळ कांद्याच्या गडगडणाऱ्या दरामुळे उत्पादकांचे गणित बिघडले असून त्याचे पडसाद ग्रामीण भागात उमटू लागले आहेत. कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, यासाठी देवळा येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको केले. गुरूवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते ९५० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाले. ‘नाफेड’ उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात कांदा खरेदी करीत आहे. त्यामुळे ‘नाफेड’च्या खरेदीला महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. यावर सकारात्मक निर्णय न झाल्यास ‘नाफेड’ आणि जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

सध्या जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठय़ा प्रमाणात आवक होत आहे. यंदा पावसाचे लवकर आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे जो कांदा चाळीत साठविता येणार नाही, तो बाजारात नेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मागील काही दिवसात दरात घसरण सुरू आहे. त्याचे पडसाद उमटत आहे. सरकारने कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान द्यावे, ‘नाफेड’ने दोन हजारहून अधिक दराने खरेदी करावी, या मागणीसाठी गुरुवारी सकाळी देवळा बाजार समिती समोर कांदा उत्पादक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला.

कांद्याला सध्या कवडीमोल भाव मिळत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये अस्वस्थता असून त्याची दखल घेऊन संबंधितांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी कांदा उत्पादक संघटनेचे संपर्क प्रमुख कुबेर जाधव, जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे, स्वाभिमानीचे राजू शिरसाठ, प्रहारचे कृष्णा जाधव यांच्यासह शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना दिले. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास नाफेड कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

अन्यथा ‘नाफेड’च्या खरेदीची पोलखोल

नाफेड महाराष्ट्रातून सव्वा दोन लाख टन कांदा खरेदी करणार आहे. तथापि, प्रतिकिलो उत्पादनास २० रुपये खर्च येत असताना नाफेडचा दर नऊ ते १२ रुपये आहे. अलीकडेच कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘नाफेड’च्या पिंपळगाव बसवंत येथील कार्यालयात धडक देऊन जाब विचारला होता. नाफेडने ३० रुपये किलो दराने कांदा खरेदी करावा, अशी मागणी केली होती. शेतकऱ्यांकडून कागदोपत्री वेगळी आणि प्रत्यक्ष खरेदी वेगळी अशा तक्रारी येत आहेत. ‘नाफेड’ची संपूर्ण कांदा खरेदी पारदर्शक पद्धतीने करावी, अन्यथा फेडरेशनच्या कांदा खरेदीची संघटनेकडून पोलखोल केली जाईल,  यामध्ये गैरप्रकार आढळल्यास ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. त्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली जाईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे.

बाजार समितीनिहाय दरात तफावत

लासलगाव बाजार समितीत गुरुवारी सकाळच्या सत्रात १० हजार ८० क्विंटलची आवक झाली. त्यास सरासरी ९५१ रुपये भाव मिळाला. नांदगाव बाजार समितीत सरासरी ७००, दिंडोरीत ९५० रुपये, देवळा बाजार समितीत प्रतवारीनुसार सरासरी ९०० ते हजार रुपये,  सिन्नर ८०० रुपये दर मिळाले. इतर बाजार समित्यांमध्ये यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. बाजार समित्यांच्या दरात प्रतवारीनुसार २०० ते ३०० रुपयांचा फरक आहे.