नाशिक : शहरातील सिटी सेंटर मॉललगत असलेला कॉलनी रस्ता हा शहर वाहतूक विभागाच्या वतीने बंद करण्यात आल्याने सिडकोकडून सिटी सेंटर मॉलकडे जाणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय होत आहे.
सिटी सेंटर मॉल परिसर कायमच गजबजलेला असतो. त्यात वाहनांच्या गर्दीची भर पडते. वाहनांची गर्दी टाळण्यासाठी मॉल परिसराला लागूनच कॉलनी रस्ता आहे. या रस्त्यामुळे मॉलसमोरील गर्दी टाळता येते. महालक्ष्मी मंदिरमार्गे लक्षिका मंगल कार्यालयासमोर या रस्त्याने थेट जाता येते. यामुळे महात्मा नगर परिसर, सातपूरकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून या कॉलनी परिसराचा वापर वाहनचालकांकडून होत आहे. काही दिवसांपूर्वी मॉलजवळ असलेल्या मोकळय़ा जागेत नामांकित बांधकाम व्यवसायिकाच्या मॉल बांधणीचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी बांधकामासाठी लागणाऱ्या विटा, रेती, सिमेंट यासह अन्य साहित्याची अवजड वाहनांव्दारे ये-जा सुरू झाली. यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ या ठिकाणी आली आहे. कॉलनी परिसरात वाहतूक कोंडी होऊ लागल्याने वाहतूक विभागाच्या वतीने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यासाठी अडथळे उभारण्यात आले. यामुळे वाहनांना कॉलनी परिसरातून ये -जा करण्यावर निर्बंध आले. याच मार्गावर महालक्ष्मीचे मंदिर आहे. जवळच जॉगिंग ट्रॅक आहे. स्थानिकांना रस्ता बंद झाल्याने ये- जा करण्यात अडचणी येत आहेत. सिडकोकडून येणाऱ्या वाहनचालकांना सिग्नलपर्यंत जाऊन वळण घेत कॉलनी रस्ता गाठावा लागत आहे.
यासंदर्भात वैद्य विक्रांत जाधव यांनी माहिती दिली. रस्ता बंद असल्याने कॉलनीतून मुख्य रस्त्यावर वाहने काढण्यासाठी अडचणी येतात. या ठिकाणी मोठा मॉल बांधला जात आहे. मॉलसमोरही निवासी इमारत होत आहे. मोठय़ा प्रमाणावर वाहने येत असल्याने वाहतूक कोंडी होईल. रस्ता बंद हा पर्याय असू शकत नाही. याविषयी ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
सामान्यांची व्यथा
याच मार्गावर महालक्ष्मीचे मंदिर आहे. जवळच जॉगिंग ट्रॅक आहे. स्थानिकांना रस्ता बंद झाल्याने ये- जा करण्यात अडचणी येत आहेत. सिडकोकडून येणाऱ्या वाहनचालकांना सिग्नलपर्यंत जाऊन वळण घेत कॉलनी रस्ता गाठावा लागत आहे.