रहाडींवर रंग, राजकारणास मात्र लगाम
नाशिक : करोनाकाळातील र्निबधाचे सावट दूर झाल्यामुळे रंगात चिंब होण्यासाठी तरुणाई सज्ज झाली असतानाच प्राचीन परंपरा लाभलेल्या शहरातील ऐतिहासिक रहाडींवर रंगोत्सव साजरा करण्यास पोलिसांनी परवानगी दिल्यामुळे उत्साहात भर पडली आहे. सार्वजनिक मित्रमंडळांना मंगळवारच्या रंगोत्सवात आवाजाच्या भिती अर्थात कर्कश आवाजाची (डीजे) ध्वनियंत्रणा वापरता येणार नाही. पारंपरिक वाद्यांचा वापर करता येईल. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या उपक्रमांमधून प्रचाराची संधी साधली जाण्याची शक्यता होती. त्यास पोलिसांनी चाप लावला असून अशा ठिकाणी राजकीय पक्षांचे झेंडे, फलक लावण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
करोनाच्या संकटामुळे दोन वर्षे रंगपंचमीसह बहुतांश सणोत्सव काही ना काही र्निबधात साजरे करावे लागले होते. तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे प्रशासनाने र्निबध शिथिल केल्यामुळे यंदा रंगपंचमी दणक्यात साजरी करण्याची तयारी सार्वजनिक मंडळांनी केली आहे. नाशिकमधील प्राचीन परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक रहाडींवर काही अटी-शर्तीसह रंगोत्सव साजरा करण्यास पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी परवानगी दिली. जुन्या नाशिकसह शहरातील अनेक भागांत सार्वजनिक मंडळांकडून रहाडींबरोबर कृत्रिम वर्षांनृत्य (रेन डान्स) अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. करोनाच्या आधी काही वर्ष पाणीटंचाईची स्थिती असल्याने राजकीय पक्ष आणि संघटनांना कोरडी रंगपंचमी साजरी करावी लागली होती. यंदा तशी स्थिती नाही. धरणांमध्ये मुबलक जलसाठा असून अलीकडेपर्यंत अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी कृत्रिम वर्षांनृत्य (रेन डान्स) आयोजन करण्यात आले आहे. त्यास महापालिका निवडणुकीची किनार आहे. अशा उपक्रमांना पोलिसांनी काही अटी-शर्तीवर परवानगी दिली. त्यात मंडळांना सायंकाळी ६ पर्यंत परवानगी राहील. उपरोक्त ठिकाणी केवळ पारंपरिक वाद्यांचा वापर करता येईल. कर्कश आवाजाच्या ध्वनी (डीजे) यंत्रणेचा वापर करता येणार नाही. तसेच संबंधित ठिकाणी राजकीय पक्षांचे झेंडे वा फलक लावता येणार नसल्याचे बजावण्यात आले आहे. याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी दिली. या अटी-शर्तीमुळे रंगोत्सवातून प्रचाराची तयारी करू पाहणाऱ्यांना पायबंद बसणार आहे. मनपा निवडणुकीमुळे इच्छुकांकडून प्रभागवार रंगोत्सवानिमित्त आधिक्याने कार्यक्रमांची तयारी करण्यात आली. संबंधित ठिकाणी प्रचार होईल, असे साहित्य लावण्यास र्निबध आल्याने त्यांच्या तयारीवर पाणी फेरले जाणार आहे. दरम्यान, कर्कश ध्वनिक्षेपक यंत्रणा लावण्यास परवानगी नाकारल्याने अनेक मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून नाराजीचा सूर उमटत आहे. नाशिक ग्रामीणसह धुळे, औरंगाबाद आदी ठिकाणी डीजेला परवानगी मिळाली. नाशिक शहरात वेगळी नियमावली का, असा प्रश्न मधली होळी येथील कार्यकर्ते चेतन व्यवहारे यांनी उपस्थित केला.
रासायनिक रंगाऐवजी पर्यावरणपूरक रंगांना प्राधान्य
जिल्ह्यात फाल्गुन पौर्णिमेनंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी मोठय़ा उत्साहाने साजरी केली जाते. नाशिककरांचा उत्साहाला उधाण आणण्यासाठी विक्रेत्यांनी बाजारपेठेत विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध केले आहे. पर्यावरण संवर्धनाविषयी प्रबोधन होत असल्याने रंगप्रेमींनी रासायनिक रंगाऐवजी पर्यावरणपूरक रंगांना प्राधान्य दिले आहे. ग्राहकांची आवड लक्षात घेऊन रंग २० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत वेगवेगळय़ा वजनांत उपलब्ध आहेत. बच्चे कंपनीसाठी विविध प्रकारच्या पिचकाऱ्या २० रुपयांपासून अगदी ७०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. करोनाकाळात रंगपंचमी साजरी करण्यास मर्यादा होती. यंदा र्निबध नसल्याने खरेदीत कोणी हात आखडता घेतलेला नाही. नाशिकप्रमाणे येवल्यात रंगांचा सामना रंगणार आहे.