नाशिक: कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या २३ वर्षांच्या वाटचालीत आतापर्यंत १८७९ एव्हिएटर्सना प्रशिक्षण देण्यात आले. तीन शिक्षणक्रमांनी सुरू झालेल्या या संस्थेत आज ती संख्या १८ वर पोहोचली आहे. दरवर्षी साधारण १५० हून अधिक अधिकाऱ्यांना येथे हेलिकॉप्टर आणि मानवरहित विमानांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणातून भारतीय लष्कराच्या आर्मी एव्हिएशन अर्थात लष्करी हवाई दलात २० महिला आज एव्हिएटर्सची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. चार वर्षांपूर्वी देशातील पहिल्या महिला कॉम्बॅट एव्हिएटर अर्थात लढाऊ वैमानिक बनलेल्या मेजर अभिलाषा बराक यांच्या कामगिरीचा उल्लेख कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) ५९ व्या दीक्षांत सोहळ्यात झाला.
मंगळवारी स्कूलचा दीक्षांत सोहळा आर्मी ट्रेनिंग कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ, लेफ्टनंट जनरल देवेंद्र शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या सोहळ्यात आर्मी एव्हिएटर्स, आर्मी हेलिकॉप्टर प्रशिक्षक (इन्स्ट्रक्टर) आणि आरपीएएस अर्थात ‘रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट इन्स्ट्रक्टर’ आणि कम्बाइंड इंटरनल पायलट आणि ऑब्झर्व्हर (संयुक्त वैमानिक व निरीक्षक) या शिक्षणक्रमांतील अधिकाऱ्यांचा एकाच वेळी दीक्षांत सोहळा झाला. यावेळी ‘एव्हिएशन शक्ती’ प्रात्यक्षिकातून युद्धभूमीवरील कारवाईची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर झाली. यामध्ये हेलिकॉप्टर्स व मानवरहित विमाने, हेक्झाकॉप्टरचा मोठा ताफा सहभागी झाला होता.
लष्करी हवाई दल सैन्यासोबत शस्त्रसामग्री, दारूगोळा पोहोचवण्यापासून ते युद्धभूमीवरील जखमींना सुखरूपपणे नेण्यापर्यंत कोणकोणती कारवाई करते, त्याचे दर्शन घडवले गेले. ही प्रात्यक्षिके भारतीय वैमानिकांचे कौशल्य, लष्करी सामग्रीची क्षमता आणि युद्धकाळात वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही यशस्वी करण्याची त्यांची तयारी दर्शवते, असे लेफ्टनंट जनरल शर्मा यांनी नमूद केले.
गांधीनगरस्थित प्रशिक्षण केंद्राचा आढावा घेताना लेफ्टनंट जनरल शर्मा यांनी हे केंद्र आज लष्करी हवाई संचलनातील महत्त्वाच्या मोहिमा अर्थात ‘कॉम्बॅट एअर क्रू ऑपरेशन्स’ आणि ‘ड्रोन सिस्टीम’साठी एक तज्ज्ञांचे केंद्र म्हणून ओळखले जात असल्याचे सांगितले. लष्करातील स्त्री-पुरुष समानतेवर बोलताना त्यांनी आजच्या सोहळ्यात दोन महिला अधिकाऱ्यांना ‘वैमानिक’ तर, एका महिला अधिकाऱ्याला ‘आरपीएस’ वैमानिक परवाना प्रदान करण्यात आल्याचे नमूद केले.
सध्या भारतीय लष्करामध्ये २० महिला कॉम्बॅट एव्हिएटर्स सक्रिय सेवा बजावत आहेत. देशातील पहिल्या महिला कॉम्बॅट एव्हिएटर मेजर अभिलाषा बराक या सध्या जम्मू-काश्मीरमध्ये ‘एएलएच युटिलिटी हेलिकॉप्टर’ चालवत असून, इतर महिला अधिकारी देखील देखभाल-दुरुस्ती विभागात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळत असल्याचे त्यांनी सांगितले.
अभिलाषा बराक कोण आहेत?
दीक्षांत सोहळ्यात गौरवपूर्ण उल्लेख झालेल्या रोहतक येथील अभिलाषा बराक यांनी २०२२ मध्ये कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन स्कूलमधून पूर्व सैन्य वैमानिक आणि नंतर लढाऊ वैमानिक हे दोन्ही प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले होते. लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून आर्मी एव्हिएशनमध्ये (लष्करी हवाई दल) दाखल होणाऱ्या त्या पहिल्याच महिला ठरल्या. या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी त्यांनी मोडून काढली. बराक यांचा भाऊ लष्करात आहे. तेथील मानमरातब, प्रतिष्ठा पाहून त्या देखील या सेवेकडे आकृष्ट झाल्या.
अणुविद्युत आणि दूरसंचार विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर इच्छाशक्तीच्या बळावर त्या लष्करात दाखल झाल्या. वैमानिक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी वैमानिक योग्यता चाचणी (पीएबीटी) महत्त्वाचा टप्पा असतो. कारण, त्यावर करिअरचे भवितव्य ठरते. उमेदवार ही चाचणी केवळ एकदाच देऊ शकतो. मानसिक सतर्कता, आत्मविश्वास, संभाव्य उड्डाणात मज्जातंतूंवर नियंत्रण आदींची पडताळणी केली जाते. आवश्यक निकष पूर्ण केलेल्या लष्करी अधिकाऱ्यांची वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड होते.
