जळगाव – आठ राज्यांतील ११ हजार तांड्यांवर प्रत्यक्ष संपर्क करून तीन हजार तांड्यांवर बंजारा बांधवांचे धर्मांतर झाले आहे. सर्व बांधवांना पुन्हा सनातन हिंदू धर्मात परत आणणार आहोत. हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाज जागृत करण्यासाठी व समाजाला दिशा देण्यासाठी कुंभ आयोजित करण्यात आला आहे, असे संत बाबूसिंगजी महाराज यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जामनेर तालुक्यातील गोद्री येथे अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाजाच्या महाकुंभाची बुधवारपासून सुरुवात झाली. यावेळी धर्मसभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर पोहरागडदेवी संस्थानचे गादीपती बाबूसिंगजी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्मजागरण समितीचे प्रमुख शरद ढोले, संत गोपाल चैतन्य महाराज, तेलंगणा येथून आलेले सुरेश महाराज, वृंदावनचे गुरू शरणानंद महाराज व गोपाल चैतन्य महाराज आदी संत उपस्थित होते. यावेळी अखिल भारतीय धर्मजागरण समितीचे प्रमुख शरदव ढोले यांनी बंजारा समाजाचे धर्मांतरण होऊ नये यासाठी तसेच धर्मांतरण थांबविण्यासाठी शेकडो संत येथे आले असल्याचे सांगितले.

हेही वाचा – नाशिकमध्ये मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी – अब्दुल कादर मुकादम अध्यक्षपदी

संत गोपाळ चैतन्य महाराज यांनी संत समाज धर्मरक्षणाचे काम करतो. तीन हजार गावांत धर्मपरिवर्तन झाले आहे, म्हणून कुंभाची गरज पडली आहे. हिंदू समाजात जागृती होण्यासाठी आणि धर्मरक्षणासाठी हा कुंभ आहे, असे सांगितले. संत बाबूसिंग महाराज यांनी समाज संघटित होण्यासाठी हा कुंभ आहे. भक्तिमार्गातून दिशा मिळते. समाजाला जागृत करण्यासाठी संत व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत. बंजारा समाजाचा प्रथम कुंभ गोद्री येथे होत असून, हा ऐतिहासिक व अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगितले.

संत सुरेश महाराज यांनी आम्ही सनातनी आहोत आणि सनातनी राहू. सीमेवर सैनिक देश आणि भारत मातेच्या संरक्षणासाठी उभा असतो, तर धर्मासाठी संत समाजात उभे असतात, असे सांगितले. पूज्य महामंडलेश्‍वर शरणानंद महाराज यांनी बंजारा समाज देशभर पसरलेला असून धार्मिक आहे. बालाजी भगवान आणि हातीराम बाबा श्रद्धास्थान आहेत, असे सांगत त्यांनी उपस्थितांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. महाकुंभासाठी लाखो समाजबांधवांनी हजेरी लावली असून, महिलांची लक्षणीय उपस्थिती आहे.

बुधवारी सकाळी नऊ ते साडेदहापर्यंत पल्ला, साडेदहा ते साडेअकरा या वेळेत मूर्ती स्थापना करण्यात आली. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार व पोलीस अधिकारी उपस्थित होते. गोपाल चैतन्य बाबा महाराजांनी प्रास्ताविक केले. दुपारी बारा ते चार या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. दुपारी चार ते सहा या वेळेत संत प्रवचनासह संत सेवालाल महाराज अमृतलीला हे कार्यक्रम झाले. शासकीय यंत्रणांतर्फे सोयी-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. जळगाव शहर वाहतूक शाखाही महाकुंभासाठी येणार्‍या वाहतुकीवर नियंत्रण ठेवत आहे.

दरम्यान, गोद्रीसह लगतच्या सहा ते सात किलोमीटर परिसरातील गावांत बंजारा समाजाच्या संत-महंतांचे आगमन झाले. अश्‍व असलेल्या अकरा रथांमध्ये संत-महंतांची शोभायात्रा काढण्यात आली. अग्रभागी सजविलेल्या वाहनात परमपूज्य संतश्री धोंडिरामबाबा, आचार्य चंद्रबाबा महाराज यांच्या मूर्ती विराजमान होत्या. या वाहनामागे संतांचे रथ व त्यामागे संतांचे अनुयायी असलेले दहा ट्रॅक्टर होते. याप्रसंगी पाच बँड, नाशिक येथील दोन ढोल पथकांसह शोभायात्रा कुंभस्थळाहून धर्मस्थळाकडे नेण्यात आली.

हेही वाचा – नाशिक: सावजाच्या शोधात बिबट्या विहीरीत

शोभायात्रेवर हेलिकॉप्टरद्वारे कुंभस्थळाजवळ आणि शोभायात्रा मार्गावर पुष्पवृष्टी करण्यात आली. महिलांनी पारंपरिक पोशाखात व लोकगीते गात तिज आणले. कुंभस्थळी महिला गटागटाने पारंपरिक लोकगीते गात नृत्य करीत होत्या. युवकांसह नागरिकांनी ‘हा मै हिंदू हूँ, हा म हिंदू छु’ असे लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. गोद्रीलगतच्या पिंपळगाव, शेवगा, रवळा, जामठी, पठार तांडा, गोद्री सुकानाईक तांडा, फत्तेपूर या प्रत्येक गावांत काही संतांचे आगमन झाले होते. याच संतांची शोभायात्रा काढण्यात आली. अग्रस्थानी बाबूसिंग महाराज यांचा रथ होता. त्यासोबत गोपाल चैतन्य महाराज, दिव्य चैतन्य महाराज, हरी शरणांनंदन महाराज, सर्व चैतन्य महाराज, राधे चैतन्य महाराज आदी संत-महंत अकरा रथांमध्ये विराजमान होते. अकरा रथांमध्ये 25 पेक्षा अधिक संत-महंत होते.

महाकुंभासाठी राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे 88 लाख 50 हजारांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. पैकी नऊ लाख पन्नास हजारांचा खर्च व्हीआयपी निवासव्यवस्थेवर, तर आनुषंगिक बाबीच्या नावाखाली दहा लाखांच्या खर्चाचाही समावेश आहे. महाकुंभासाठी होणार्‍या खर्चास वीस जाऩेवारी रोजी शासन मान्यता देण्यात आली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commencement of godri mahakumbha conversion of banjara community on three thousand tandas ssb
First published on: 25-01-2023 at 19:24 IST