जळगाव: दोन्ही मुलीच आल्याने पत्नीचा खून करुन आत्महत्या | committed suicide by killing his wife amy 95 | Loksatta

जळगाव: दोन्ही मुलीच आल्याने पत्नीचा खून करुन आत्महत्या

दोन्ही मुलीच जन्माला आल्याने निराश झालेल्या मद्यपी पतीने पत्नीची हत्या करीत स्वतःही रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली.

जळगाव: दोन्ही मुलीच आल्याने पत्नीचा खून करुन आत्महत्या
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

दोन्ही मुलीच जन्माला आल्याने निराश झालेल्या मद्यपी पतीने पत्नीची हत्या करीत स्वतःही रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. बुधवारी चाळीसगाव येथील जुना करगाव रोड भागातील जय गणेशनगरात ही घटना घडली.चाळीसगाव येथील धुळे-जळगाव रेल्वेमार्गाजवळील जय गणेशनगर भागातील रहिवासी सूरज कुर्हाडे (२८) आणि रेश्मा कुर्हाडे (२४) हे पती-पत्नी मोलमजुरी करीत संसाराचा गाडा हाकत होते. त्यांना दीड वर्षाची मुलगी आहे.

हेही वाचा >>>नाशिक: बालकांसाठी कार्यरत संस्थांची माहिती संकलन – महिला बालविकास विभाग सतर्क

सूरजला नंतर मद्याचे व्यसन जडले. त्यामुळे पती-पत्नीत वाद होऊ लागले. पत्नीला पुन्हा दुसरी मुलगीच झाल्याने सूरज निराश झाला होता. दुसरी मुलगी तीन महिन्यांची झाल्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी सूरज हा बाळंतपणासाठी गेलेल्या पत्नीला घेण्यासाठी जुनोने (ता. जि. धुळे) येथे गेला होता. दोन दिवस सासूरवाडीत मुक्कामानंतर २८ नोव्हेंबर रोजी तो पत्नीसह दोन्ही मुलांना घेऊन चाळीसगाव येथे आला. बुधवारी लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येत असल्याने शेजारी राहत असलेले नातेवाइक चौकशीसाठी घरात गेले. त्यांना रेश्मा ही मृतावस्थेत दिसून आली. त्यांनी रेश्माच्या माहेरी घटनेबाबत माहिती दिली.

हेही वाचा >>>नाशिक: शहरात १५ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू

दरम्यान, धुळे रेल्वेमार्गावर रेल्वेखाली झोकून देत एकाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून समजली. तेथे नातेवाइक गेले असता, तो मृतदेह सूरज कुर्हाडे याचा असल्याचे उघड झाले. पत्नीचा खून केल्यानंतर सूरजने स्वतःही रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. मृत रेश्माचा भाऊ प्रताप गायकवाड (रा. जुनोने, धुळे) याने दिलेल्या तक्रारीवरून चाळीसगाव येथील शहर पोलीस ठाण्यात सूरजविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 20:55 IST
Next Story
नाशिक: शहरात १५ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू