नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे २५ वे राज्य अधिवेशन २२ ते २४ जून या कालावधीत शहरात बोधले नगरातील श्रीकृष्ण लॉन्स येथे होणार आहे. अधिवेशनात २३ जून रोजी स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्काराने ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते डॉ. भालचंद्र कांगो यांना सन्मानित करण्यात येणार आहे.अधिवेशन स्थळाला स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड नगर, कॉम्रेड ए.बी.वर्धन विचार मंच जनसत्याग्रही यांचे तर, प्रवेशव्दारांना सत्यशोधक कॉम्रेड पुंजा बाबा गोवर्धने, स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड कुसुमताई गायकवाड, कॉम्रेड फकीरराव डावखर यांचे नाव देण्यात येणार आहे.
अधिवेशनाचा प्रारंभ शहरातून काढण्यात येणाऱ्या फेरीने होईल. त्यानंतर होणाऱ्या जाहीर सभेस भाकपच्या राष्ट्रीय सचिव अमरजीत कौर, आयटकचे महासचिव पद्मा पाशा, भाकपचे राज्य सचिव सुभाष लांडे, सहसचिव डॉ. राम बाहेती, राजू देसले मार्गदर्शन करतील. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. भालचंद्र कांगो राहतील.पहिल्या दिवशी सायंकाळी सहा वाजता भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने ॲड. जयंत जायभावे यांचे ”भारतीय संविधान लोकशाहीचा गाभा ”विषयावर व्याख्यान होईल, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संविधान अभ्यासक सुरेश सावंत राहतील.
दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजता स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्काराने डाॅ. भालचंद्र कांगो यांना नाशिक येथील स्वातंत्र्यसैनिक माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गौरविण्यात येणार आहे. रोख रक्कम ५१ हजार. स्मृतीचिन्ह, शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे. ज्येष्ठ पत्रकार तथा माजी खासदार कुमार केतकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते तुकाराम भस्मे राहतील.
अधिवेशनात राजकीय, संघटनात्मक अहवालावर प्रतिनिधी चर्चा करतील. पुढील तीन वर्षाचा कार्यक्रम ठरविण्यात येईल. राज्यभरातून ४०० प्रतिनिधी सर्व जिल्ह्यातून सहभागी होतील. शेवटच्या दिवशी नवीन राज्य कौन्सिल आणि राज्य पदाधिकारयांची निवड करण्यात येणार आहे. २२ आणि २३ जून रोजी अधिवेशनस्थळी रात्री इप्टाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम होईल. अधिवेशनाची स्मरणिकाही प्रकाशित करण्यात येणार आहे.