प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप आणि रब्बी हंगाम २०२२-२३ करिता विमाक्षेत्र अधिसूचित करून राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेत पिकांच्या झालेल्या नुकसानीला विमा संरक्षण मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीच्या तालुका व जिल्हास्तरीय विमा प्रतिनिधींशी वेळेत संपर्क साधून तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत एक लाख ६५ हजार ६० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.

हेही वाचा- नाशिक : इंधन प्रकल्पाजवळील नदीतील पाण्याला फेस; शेत पिकांवर परिणाम होण्याची शक्यता

खरीप पिकांना मिळणार विमा संरक्षण

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१६-१७ हंगामापासून लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत पिकांचे काढणीपश्चात व स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी विमा संरक्षण देण्यात येणार आहे. त्यात पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, भूस्खलन, पावसातील खंड, कीड व रोग आदींमुळे उत्पादनात येणारी घट जोखमीच्या बाबींमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच या योजनेत खरीप हंगामात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, भुईमूग, सोयाबीन, कारळा, मूग, उडीद, तूर, कापूस व कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण प्राप्त झाले आहे.

हेही वाचा- ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या; मालेगावात महाविकास आघाडीचे आंदोलन

या नंबरवर साधा संपर्क

हवामान घटकाच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान तसेच पिकांचे काढणीपश्चात व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आदींचा या योजनेंतर्गत समावेश आहे. याकरिता शेतकऱ्यांनी नियुक्त करण्यात आलेल्या एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनीकडे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत १८००२६६०७०० या टोल फ्री क्रमांकावर, ७३०४५२४८८८ व्हॉट्सॲप क्रमांक तसेच प्रधानमंत्री फसल बीमा योजना पोर्टलवर तक्रार दाखल करावी. अधिक माहितीसाठी तालुका व जिल्हास्तरीय पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी रूपेश दीक्षित (८४७०९ २२४४६), राजेश गायकवाड (९८५०२ ३७३३४) यांच्याशी संपर्क साधावा.