scorecardresearch

सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध स्पर्धाचेही आयोजन;नाशिकमध्ये पर्यटन महासंचालनालयातर्फे द्राक्ष महोत्सव

द्राक्ष पंढरी ते वाइन सिटी असा प्रवास करणाऱ्या नाशिक शहरात पर्यटन महासंचालनालयाच्या वतीने २६ आणि २७ मार्च रोजी ग्रेप पार्क रिसॉर्ट येथे द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिनिधीक छायाचित्र

नाशिक : द्राक्ष पंढरी ते वाइन सिटी असा प्रवास करणाऱ्या नाशिक शहरात पर्यटन महासंचालनालयाच्या वतीने २६ आणि २७ मार्च रोजी ग्रेप पार्क रिसॉर्ट येथे द्राक्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या माध्यमातून द्राक्ष विपणनावर भर देण्यात येणार असून कला, सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन यानिमित्ताने करण्यात आले आहे.

नाशिक विभागात पर्यटन महासंचालनालयाच्या वतीने यंदा प्रथमच द्राक्ष महोत्सव होत आहे. करोनाच्या सावटामुळे दोन वर्षांपासून अशा प्रकारच्या कार्यक्रमांवर र्निबध आले होते. त्यामुळे नाशिककरांना अशा महोत्सवांमध्ये सहभागी होता आले नाही.आता करोनाचे र्निबध शिथिल झाल्याने द्राक्ष महोत्सवाच्या आयोजनासाठी पर्यटन महासंचालनालयाने पुढाकार घेतला आहे. या महोत्सवात नाशिक परिसरातील विविध प्रकारच्या द्राक्ष प्रजातींचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे.

महोत्सवानिमित्त उत्कृष्ट प्रकारच्या द्राक्ष खरेदीचा आनंद तर घेता येणारच आहे. शिवाय महिला, मुले, कुटुंब या सर्वासाठी या महोत्सवात काही ना काही आहे. महिलांसाठी द्राक्ष पाककला स्पर्धा, वारली चित्रकला कार्यशाळा, द ग्रेट ग्रेप एस्केप-फॅमिली कार ट्रेझर हंट, वाइन प्रदर्शन आणि विक्री, कलादालन, शिपिंग बाजार, अक्षरलेखन प्रात्यक्षिक तसेच कार्यशाळा, विनियार्ड आणि वायनरी फेरी, फॅशन शो असे विविधरंगी कार्यक्रमांचे आयोजन हे या महोत्सवाचे वैशिष्टय़ ठरणार आहे. महोत्सवात वाइन प्रदर्शन आणि विक्रीही होणार असल्याने जिल्ह्यातील वाइन उत्पादकांना आपल्या वाइनचा प्रचार करण्यासाठी ही एक मोठी संधी आहे.  याशिवाय मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असल्याची माहिती उपसंचालक मधुमती सरदेसाई-राठोड यांनी दिली.

 महोत्सवात स्थानिक कला आणि परंपरांना प्राधान्य देण्यात आले आहे. करोना र्निबधात हे सर्व बंद झाले होते. त्यामुळे स्थानिक कला आणि कलाकारांना कुठे तरी अशा कार्यक्रमांची गरज निर्माण झाली होती. ती या महोत्सवामुळे पूर्ण होणार आहे. स्थानिक संस्कृतीच्या प्रसारासह स्थानिकांना या महोत्सवातून कोणत्या ना कोणत्या प्रकारे आर्थिक लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न होणार आहे.  नाशिक ढोलचा दणदणाट संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. हा दणदणाट या महोत्सवातही होणार आहे. याशिवाय आदिवासी नृत्य होणार आहे. पहिल्या दिवशी फॅशन शो आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी एमएच-१५ वाद्यवृंदासह संगीत संध्या कार्यक्रम होईल.

पर्यटकांनी या महोत्सवात सहभागी होऊन आनंद लुटावा, असे आवाहन पर्यटन महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे. महोत्सवासंदर्भात अधिक माहितीसाठी ०२५३-२२५७००५९ या क्रमांकावर संपर्क साधावा.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Competitions cultural programs grape festival nashik directorate general of tourism grape park resort amy

ताज्या बातम्या