साहेब, कुठपर्यंत ताणायचं..जाऊ द्या ना !

गंगापूर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांचा एकेरी उल्लेख करत कुठे आहे तो असे विचारले

राजकीय वरदहस्त लाभलेल्या ‘भाई’च्या दबंगगिरीपुढे पोलीस यंत्रणेने सपशेल लोटांगण घातले असून तक्रारदारालाच प्रकरण कुठपर्यंत ताणायचे.. मध्यस्थी करायला हरकत नाही.. असा अनाहुत सल्ला दिला जात आहे. येथील गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रारदार राहुल कुलकर्णी यांना आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात..
मागील शनिवारी थत्ते नगर परिसरात सायंकाळी महिंद्रा कोटक बँकेच्या समोरील वाहनतळात चार चाकी वाहनाला एका मोटारीने धडक देत पलायन केले. या विषयी कुलकर्णी यांच्या शिपायाने कोणत्या गाडीने ठोकले, त्याची माहिती त्यांना दिली. गाडीचे कितपत नुकसान झाले त्याचा अंदाज घेण्यासाठी कुलकर्णी बाहेर गेले, त्याच वेळी तीच गाडी पुन्हा त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. त्यातून २२-२६ वयोगटातील दोन-तीन युवक बाहेर आले. कुलकर्णी यांनी त्या टोळक्याला जाब विचारायचा प्रयत्न केला असता, टोळक्यातील एकाने तुला गाडी कोणाची ते माहीत नाही का ? एका व्यक्तीचे नाव घेत त्यांना ओळखत नाही का असे म्हणत कुलकर्णी यांच्याकडे कटाक्ष टाकत टोळक्याने हसायला सुरूवात केली. या प्रकाराने वैतागलेल्या कुलकर्णी यांनी कोण ती व्यक्ती अशी विचारणा केली असता त्या युवकांनी त्यांच्यावर थेट हल्ला चढविला. त्यांना मारहाण सुरू असतांना त्यांच्या ग्राहकाने त्यांना सोडवत गंगापूर पोलीस ठाणे गाठले. दरम्यान, हे टोळके तेथे येऊन धडकले. गंगापूर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांचा एकेरी उल्लेख करत कुठे आहे तो असे विचारले. पोलीस ठाण्यातील संशयितांचे वागणे असे होते. त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता कुलकर्णी यांची तक्रार लिहुन घेतली. सायंकाळी उशिराने पोलीस ठाण्यातून संशयितांना अध्र्या तासात सोडून दिल्याचे कर्मचाऱ्यानी सांगितले.
मारहाणीत आपल्या नाकाला फॅक्चर व डोळ्याला गंभीर दुखापत झाली. आठ दिवसाचा कालावधी उलटल्यानंतर संशयितांवर काय कारवाई झाली याची विचारणा केली असता, समोरून साहेब प्रकरण कुठंपर्यंत ताणायचे हे आपल्या हातात आहे. तीन हजार रुपयात जामीन होऊन जातो. नुकसान भरपाई घेऊन प्रकरण मिटवून घ्या असा सल्ला देण्यात आला. दरम्यान, या प्रकरणातील संशयिताचे वडिल हे राजकीय पक्षांशी संबंधित असून त्यांनी आपली दवाखान्यात भेट घेत प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिला. गाडी त्याची नसल्याचा दावाही त्यांनी केला. पोलिसांकडून संशयितांवर कारवाई ऐवजी तक्रारदाराला तडजोड करण्याचा सल्ला दिला जात असल्याचे आश्चर्य वाटते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Complainant rahul kulkarni experience in gangapur police station