नाशिक : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे ९ एप्रिल रोजी आभासी पद्धतीने घेतलेल्या जीपीएटी परीक्षेत देशभर अत्यंत धक्कादायक गोंधळ पाहायला मिळाला. यामुळे देशभरातील औषधनिर्माणशास्त्रचे विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांकडून संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, धुळे, वर्धा आदी ठिकाणांहून या तक्रारी आलेल्या असून शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाने विद्यार्थ्यांच्या बाजूने लढा सुरू केला आहे. राष्ट्रीय स्तरावरील या परीक्षेचे गांभीर्य लक्षात घेता ही परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने परीक्षा घेण्याची मागणी देशभरातील विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच अनेक संघटनांकडून होत आहे.

 केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या एनटीएकडून जीपीएटीचे आयोजन राष्ट्रीय स्तरावर केले जाते. या वर्षीची परीक्षा ९ एप्रिल रोजी घेण्यात आली. कोणतीही तपासणी न करता विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात बसविणे, परीक्षा क्रमांकानुसार आसन व्यवस्था नसणे, काही मुलांची बायोमेट्रिक हजेरी न घेणे, यामुळे अनेक गैरप्रकार घडले. परीक्षेदरम्यान भ्रमणध्वनीचा वापर, समाज माध्यमात उत्तरे पाहणे, चर्चा करून प्रश्नपत्रिका सोडविणे, असे प्रकार घडल्याचे देशभरात अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. सदर प्रकार मेलद्वारे कळवल्यानंतरही याची दखल घेतली गेली नाही. यामुळे या परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यात अनेक अभ्यासू विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची भावना असून मानसिक आणि भावनिक निराशेचे वातावरण आहे.

परीक्षा पूर्ण करताना अनेकांच्या उत्तरपत्रिका आभासी प्रणालीत जमा झाल्याचा संदेश न दिसल्याने विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक आहे. परीक्षा अधिकाऱ्यांना कळविले असता त्यांनी लॅपटॉप किंवा दुसऱ्या संगणकावर विद्यार्थ्यांचे लॉग इन करून पुन्हा प्रश्नपत्रिका सोडविण्यास सांगितले. असे झाल्याने विद्यार्थी या झालेल्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. अशा अनेक प्रकारांकडे परीक्षा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी चालढकल करण्याचे धोरण स्वीकारले. हा प्रकार एनटीएला वेळोवेळी कळविला असता त्यास कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देणे तसेच लोकप्रतिनिधींना उच्च शिक्षण मंत्रालयाकडे निवेदन देण्यास सांगणे असे प्रयत्न सुरू केले आहेत. मोठय़ा प्रमाणातील गैरप्रकार लक्षात घेता निकाल लागण्यापूर्वीच ही परीक्षा रद्द करावी, नव्याने नियोजनबद्ध आणि पारदर्शक परीक्षेचे आयोजन करावे, अशी मागणी होत आहे. एनटीएने झालेली परीक्षा रद्द करून नव्याने परीक्षेची घोषणा न केल्यास विद्यार्थ्यांच्या हितासाठी न्यायालयात जाण्याचा निर्धार विद्यार्थी, शिक्षक आणि मंचाने जाहीर केला असल्याचे मंचचे डॉ. मिलिंद वाघ यांनी स्पष्ट केले.