माहितीअभावी प्रकाशक, लेखकांमध्ये संभ्रम

येथील भुजबळ नॉलेज सिटीच्या आवारात ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणाऱ्या नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटीचे रुपांतर आता कुसुमाग्रजनगरीत झाले आहे. ही नगरी आता सजायला सुरुवात झाली आहे. (छाया-यतीश भानू)

संमेलनातील प्रकाशन व्यवस्थेत नियोजनाचा अभाव

चारूशीला कुलकर्णी

नाशिक : येथील भुजबळ नॉलेज सिटीच्या आवारात ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनात वेगवेगळय़ा उपक्रमांची रेलचेल असून पुस्तक प्रकाशन ही साहित्य प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. या पर्वणीसाठी राज्यातून प्रतिसाद लाभत असताना प्रकाशक, लेखक यांना मात्र आयोजकांच्या नियोजनशून्यतेचा फटका बसत आहे. पुस्तक प्रकाशनासाठी नोंदणी करुनही त्यांना माहिती दिली जात नसल्याने लेखक आणि प्रकाशकांमध्ये संभ्रम आहे. यामुळे काहींनी संमेलनात पुस्तक प्रकाशन करण्याचे टाळले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्यप्रेमींच्या लक्षात राहण्यासाठी  वेगवेगळय़ा उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. संमेलनाचे वातावरण  तयार करण्यासाठी साहित्य, कला क्षेत्रातील वेगवेगळय़ा कार्यक्रमांची नांदी सुरू झाली आहे.

साहित्य संमेलनात आपल्या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे, ही लेखकाची इच्छा असते. लेखक-प्रकाशकांची ही इच्छा लक्षात घेऊन आयोजकांनी लेखकांना तसेच प्रकाशकांना पुस्तक प्रकाशित करण्याची संधी उपलब्ध करून दिली. यासाठी राज्यातील लेखक, प्रकाशकांना आवाहन करण्यात आले. या आवाहनाला राज्यातून प्रतिसाद मिळाला असून ऑनलाईन पध्दतीने १४४ जणांनी नोंदणी केली असून ३० नोव्हेंबपर्यंत याबाबत प्रकाशनासाठी संपर्क करण्याची मुदत देण्यात आली आहे.

दुसरीकडे, पुस्तक प्रकाशनासाठी संपर्क केलेल्या लेखक, प्रकाशकांना आपले पुस्तक कधी प्रकाशित होणार? बोलण्यास वेळ मिळेल की नाही? कोणाच्या हस्ते प्रकाशित होणार याची माहिती देण्यात आलेली नाही. संमेलनस्थळी प्रकाशनाची काय व्यवस्था असेल, याविषयी ते अनभिज्ञ आहेत. ही माहिती नसल्याने आप्तस्वकिय, स्नेही यांना त्यासंदर्भात माहिती देता येत नसल्याने लेखक, प्रकाशकांमध्ये नाराजी आहे. या गोंधळामुळे काहींनी संमेलनात पुस्तक प्रकाशन करण्याचे टाळले आहे.

दरम्यान संमेलनात चार डिसेंबर रोजी सयाजीराव गायकवाड यांच्या ६० ग्रंथांच्या प्रकाशनानंतर इतर पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. काही प्रकाशकांनी प्रकाशनाविषयी संपर्क साधला. त्यांचे अर्ज अद्याप आलेले नाही. आतापर्यंत ऑनलाईन पध्दतीने १४४ जणांनी नोंदणी केली.

ही संख्या ३० नोव्हेंबपर्यंत ३०० च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक लेखकाला १० मिनिटाचा कालावधी प्रकाशनासाठी मिळावा, यादृष्टीने नियोजन अंतिम टप्पात आहे. संमेलनपूर्व याबाबत लेखक, प्रकाशकांना माहिती दिली जाईल, असे ग्रंथ प्रकाशन समितीचे मुख्य समन्वयक विजय रहाणे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Confusion publishers writers information ysh

ताज्या बातम्या