नाशिक : अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाच्या वतीने हजर राहण्याची नोटीस दिल्याच्या विरोधात गुरुवारी ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना केंद्र सरकारकडून सक्तवसुली संचालनालयाचा गैरवापर करून त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आंदोलनप्रसंगी बाळासाहेब थोरात यांनी सोनिया गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस देणे, हा विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. केंद्र सरकार यंत्रणेचा गैरवापर करत आहे.
भारतीय जनता पक्षाच्या एकाही धोरणाची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. यामुळे लोकांमध्ये रोष आहे. नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी विरोधकांना लक्ष्य करत त्यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. २०१९ च्या निवडणुकीनंतर झालेल्या सर्वेक्षणात २०२४ ची निवडणूक भाजपसाठी कठीण असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळेच भाजपकडून कारवाया सुरू झाल्याचे थोरात यांनी सांगितले.
आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी थोरात यांच्यासह आ. सुधीर तांबे, आ. शिरीष चौधरी, आ. हिरामण खोसकर यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी आले होते. त्यांनी वाहने रस्त्यावर उभी केल्यामुळे शासकीय विद्यालयासमोरील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. आंदोलनस्थळी तसेच रस्त्यातील दुभाजकावर पक्षाचा झेंडा उलटा लावण्यात आला होता. उपस्थितांपैकी कोणाच्या तरी प्रकार लक्षात आल्यानंतर आंदोलनस्थळावरील पक्षाचा उलटा हात सरळ करण्यात आला. दुभाजकावरील पक्षाचा झेंडा तसाच फडकत राहिला. या वेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, राजेंद्र बागुल, वत्सला खैरे, राजाराम पानगव्हाणे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव आदी पदाधिकारी उपस्थित होते.राज्यात गोंधळाची परिस्थिती-थोरात शिंदे -फडणवीस सरकार सध्या सत्तेत आहे.
राज्यात पूरसदृश परिस्थिती असताना आणि १०० पेक्षा जास्त बळी गेले असतानाही अद्याप मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही. सर्व गोंधळाची परिस्थिती असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. पक्षांतर बंदीचा निर्णय विरोधात गेल्यास त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. ओबीसी राजकीय आरक्षणाचे श्रेय महाविकास आघाडीचे आहे. छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या संस्थांनी चांगले काम केले. बांठिया आयोगाकडे सर्वकाही सोपविले. त्याचे हे श्रेय असल्याचे थोरात यांनी सांगितले.
