मालेगाव : दिल्ली आणि मुंबईच्या राजकारणात विस्तवही जात नसलेले भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मालेगाव महापालिकेच्या राजकारणात चक्क ‘गळ्यात गळे’ घालून एकत्रित गट स्थापन केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, या अनपेक्षित ‘घरोब्या’ची किंमत काँग्रेसचे महानगरप्रमुख एजाज बेग यांना आता चुकवावी लागली आहे. एकीकडे भाजपच्या दोन सदस्यांनी ७२ तास उलटण्यापूर्वी काँग्रेस बरोबर स्थापन केलेल्या गटाशी काडीमोड घेतला. तर, दुसरीकडे पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने बेग यांची पदावरून तडकाफडकी हकालपट्टी केली आहे.

​मालेगाव महानगरपालिकेच्या ८४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. मात्र,इस्लाम व समाजवादी पार्टीने निवडणुकीपूर्वी स्थापन केलेल्या सेक्युलर फ्रंट या आघाडीने ४० जागांवर मुसंडी मारली आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी या आघाडीला केवळ ३ सदस्यांची गरज होती. ही उणीव भरून काढण्यासाठी काँग्रेसचे ३ आणि भाजपचे २ सदस्य एकत्र आले आणि त्यांनी ‘भारतीय विकास आघाडी’ नावाचा नवीन गट स्थापन केला. शुक्रवारी नाशिक विभागीय आयुक्तांकडे या गटाची नोंदणीही करण्यात आली. ​या गटाचे नेते म्हणून काँग्रेसचे एजाज बेग तर उपनेते म्हणून भाजपचे मदन गायकवाड यांची निवड करण्यात आली होती.

 सत्तेचा मार्ग मोकळा पण..

काँग्रेसचे महानगरप्रमुख एजाज बेग यांनी यापूर्वीच सेक्युलर फ्रंटला काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे काँग्रेस बरोबर एकत्रित गट स्थापन करणारे भाजपचे दोन सदस्य देखील ‘सेक्युलर फ्रंट’ला पाठिंबा देतील अशी अटकळ बांधली गेली होती. त्यामुळे सेक्युलर फ्रंटचे संख्याबळ ४५ वर पोहोचल्याचे दिसत होते. साहजिकच त्यांच्या दृष्टीने सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याची मानली जात होते. मात्र भाजपच्या बदलत्या भूमिकेमुळे सेक्युलर फ्रंटच्या अडचणी वाढल्या आहेत.

​ आणि ‘हात’ सुटला…

एकीकडे भाजपने भूमिका बदलल्याने काँग्रेसच्या एजाज बेग यांची गोची झाली आहे. भाजपबरोबर घरोबा करण्याचा निर्णय काँग्रेसला अजिबात रुचला नाही. ​काँग्रेस आणि भाजप या दोन परस्परविरोधी विचारधारेच्या पक्षांनी एकत्र येऊन ‘नवी चूल’ मांडल्याने प्रदेश काँग्रेस कमिटीने तीव्र संताप व्यक्त केला. काँग्रेसच्या तीन सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचे आदेश असताना, बेग यांनी परस्पर भाजपशी सलगी केल्याचा ठपका पक्षश्रेष्ठींनी ठेवला आहे. या निर्णयामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे, असे पक्षाचे मत झाले आहे. त्याची गंभीर दखल घेऊन ​प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार, पक्षाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी एजाज बेग यांची मालेगाव महानगर पदावरून हकालपट्टी केली. तसेच पुढील आदेशापर्यंत त्यांना पक्षातून निलंबित केले गेले आहे. पक्षातून कायमस्वरूपी निष्कासित का करण्यात येऊ नये? अशी कारणे दाखवा नोटीस देखील बेग यांना बजावण्यात आली आहे.