नाशिक : भाजप सरकारचे दबाव तंत्र, आर्थिक गुन्हे संचालनालयाच्या वतीने सुरू असलेली कारवाई, याविरोधात गुरुवारी शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना केंद्र सरकारकडून आर्थिक गुन्हे संचालनालयाचा गैरवापर करून त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याबद्दल शहर काँग्रेस भवनात आयोजित बैठकीत प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, राजेंद्र बागुल, वत्सला खैरे, स्वाती जाधव, विजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. आहेर आणि बागुल यांनी मनोगत व्यक्त केले. केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला.

यावेळी गुरूवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे विधिमंडळातील नेते बाळासाहेब थोरात हे करणार आहेत. काँग्रेसच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.