नाशिक – देशभरात निर्माण झालेल्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्यास केंद्र सरकार आणि भाजपचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. सरकारने अचानक गॅसच्या किंमती वाढवल्या. दुसरीकडे युद्धामुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला. सरकारने वाढवलेले गॅस दर रद्द करावेत, सिलेंडर सहजपणे उपलब्ध होण्यासाठी उपाय योजना कराव्यात, अशी मागणी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

त्र्यंबकेश्वर येथे गुरुवारपासून काँग्रेस लोकप्रतिनिधींची दोन दिवसीय कार्यशाळा सुरु झाली. याप्रसंगी सपकाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. युध्दासारखी संकटे याआधीही आली आहेत. स्वातंत्र्य पूर्व काळात इंग्रजांनी मीठावर कर आकारला त्यावेळी महात्मा गांधी यांनी आजच्याच दिवशी १९३० साली दांडी मार्च काढून ब्रिटिश सत्तेला हादरवून सोडले होते, त्याची प्रेरणा घेऊन जनतेने आज आंदोलन करून सरकारला धारेवर धरले पाहिजे असे आवाहन सपकाळ यांनी केले.

युध्दसदृश्य परिस्थिती असतांना काँग्रेस सरकारने, तत्कालीन पंतप्रधानांनी राष्ट्र म्हणून सर्वांशी संवाद साधत ठोस धोरण, योग्य नियोजन केल्याने इंधन तुटवड्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली नाही. परंतु, आज भाजप सरकारकडे आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कोणतेही धोरण नाही. याचा फटका सामान्य नागरीकांना बसत आहे. वास्तविक केंद्र सरकारने सर्व घटकांशी संवाद साधून यातून मार्ग काढला पाहिजे. असा संवाद भाजपला साधता येत नसल्याने सामान्यांना माणसे हतबल होत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांचे विचार बहुजनांचे हक्क नाकारणारे आहेत. हजारो वर्षापासूनचा हा संघर्ष आहे. अशा विचारांना छत्रपती शिवाजी महाराज यांनाही तोंड द्यावे लागले होते. त्र्यंबकेश्वरच्या भूमीतून फडणवीस यांच्यासाठी परमेश्वराकडे सुबुद्धी देवो, अशी प्रार्थना करतो. विधानभवनात बॉम्ब असल्याचा ई मेल आल्याचे ऐकून राज्यातील कायदा सुव्यवस्था किती ढासळली आहे याचा प्रत्यय येतो. विधान भवन जर सुरक्षित नसेल तर जनतेच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न सपकाळ यांनी केला.

दरम्यान, प्रशिक्षण शिबीरास प्रदेशाध्यक्ष सपकाळ, प्रशासन सरचिटणीस गणेश पाटील, मुख्य प्रवक्ते सचिन सावंत, प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, प्रदेश सरचिटणीस ब्रिज किशोर दत्त, शहराध्यक्ष आकाश छाजेड आदी उपस्थित होते. आगामी काळात पक्ष संघटना अधिक तळागाळापर्यंतत नेण्याचा संकल्प करण्यात आला.

गॅस तुटवड्याविरोधात राज्यभर काँग्रेसचे आंदोलन

सरकारने अचानक गॅसच्या किमती वाढवल्या व दुसरीकडे युद्धामुळे गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारने वाढवलेले गॅस दर तात्काळ रद्द करावे व गॅस सिलेंडर सहजपणे उपलब्ध होतील यासाठी उपाय योजना कराव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने राज्यभर आंदोलन केले.