भाजप, सेना पक्ष कार्यालयांमध्ये शांतता

नाशिक : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याची बाब स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजपमधील धुमश्चक्रीचे कारण ठरली होती. दोन्ही गटांकडून दगडांचा वर्षाव झाला. या घटनाक्रमाने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सेना, भाजपच्या कार्यालयात मात्र नेहमीप्रमाणे शांततेचे वातावरण होते. कार्यकर्त्यांची गर्दी ओसरली. निवडक पदाधिकारी, कार्यकर्ते उफाळलेल्या संघर्षावर मंथन करीत पुढील रणनीती आखत होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन्ही ठिकाणी पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.

राज्यात सेना-भाजप युती दुगंभगण्यापूर्वी महापालिका निवडणुकीत उभय पक्षांनी वेगळा मार्ग स्वीकारला होता. स्थानिक राजकारणात परस्परांमध्ये विळ्या-भोपळ्याचे नाते झाले. अलीकडच्या काळापर्यंत मित्र असणाऱ्या दोन्ही पक्षांतील संघर्ष किती टोकाला पोहचला, याची प्रचिती मंगळवारी आली. केंद्रीयमंत्री राणे यांच्याविरुध्द सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. नंतर शिवसैनिकांनी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयावर दगडफेक केली. त्यास प्रत्युत्तर देण्यास भाजप नगरसेवक, कार्यकर्ते सेना कार्यालयावर चालून गेले. त्यांनी दगडफेक के ली. सेनेकडून त्यास दगडफेकीने उत्तर दिले गेले. दोन्ही गटांकडून परस्परांवर दगडांचा वर्षाव झाला. या प्रकरणात दोन्ही पक्षांनी परस्परांविरोधात तक्रारी दिल्या. मंगळवारचा दिवस असा तणावात गेला असतांना दुसऱ्या दिवशी बुधवारी दोन्ही पक्ष कार्यालयात वातावरण कमालीचे शांत होते. पदाधिकारी आणि कायकर्त्यांची गर्दी ओसरली होती. दोन्ही कार्यालयांमध्ये निवडक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पुढील रणनीतीबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून विचारविनिमय सुरू होता. सेना कार्यालयात काही शिवसैनिक आणिा महिला आघाडीच्या कार्यकत्र्या उपस्थित होत्या. महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि विभागप्रमुखांमध्ये चर्चा झाली. नियमित कामकाजाचा तो भाग असल्याचे बडगुजर यांनी सांगितले. काही शिवसैनिक कालच्या घटनाक्रमावर चर्चा करीत होते. मनपातील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी राणे यांच्याविरोधातील फलक लावत संघर्ष पुढे सुरू राहणार असल्याचे सूचित के ले.

दुसरीकडे भाजप कार्यालयातही शांतता होती. देवयानी फरांदे, अ‍ॅड. राहुल ढिकले या आमदारांसह शहराध्यक्ष गिरीश पालवे, महेश हिरे, हिमगौरी आहेर-आडके, रश्मी हिरे-बेंडाळे अशा काही मोजक्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. आदल्या दिवशीच्या दगडफेकीमुळे कार्यालयात काचा पडल्या होत्या. त्यामुळे साफसफाई करण्यात आली. परंतु, काचांची दुरुस्ती करण्यात आली नाही. दगडफेक प्रकरणातील शिवसेनेच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांना अटक झालेली नाही. सेनेकडून फलकबाजी केली गेली. या अनुषंगाने पोलिसांकडे दाद मागण्यावर विचार विनिमय झाला. तसेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत शहरात शनिवारी किंवा रविवारी जनआशीर्वाद यात्रा काढण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यात्रेचा मार्ग आणि अन्य तयारीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.