नाशिक: आपणास काँग्रेसमधून बाहेर ढकलण्याचे तसेच आपले मामा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना राजकीयदृष्टय़ा अडचणीत आणण्याचे षडय़ंत्र पदाधिकाऱ्यांकडून रचले गेल्याचा आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघातील विजयी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वाक्षरीने नाशिकसाठी म्हणून दिलेले नागपूर आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघासाठी असलेले एबी अर्ज पुरावे म्हणून सादर करीत तांबे यांनी एबी अर्जासारख्या संवेदनशील बाबीत प्रदेशाध्यक्षांच्या अनास्थेवर बोट ठेवले.
आपण काँग्रेस सोडलेली नाही. नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारीवरून काँग्रेस पक्षांतर्गत घडलेल्या घटनाक्रमावर आमदार तांबे यांनी प्रकाश टाकला. महाविकास आघाडीच्या प्रचारात प्रदेशाध्यक्ष पटोलेंनी तांबेंवर टीका केली होती.युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची कारकीर्द संपल्यापासून आपण संघटनेत कामाची संधी मागत होतो, परंतु तसे घडले नाही. वडिलांची जागा लढविण्याची मानसिकता नव्हती. पक्षाकडून संधी न दिली गेल्याने अखेर वडिलांनीच थांबण्याचा निर्णय घेतल्याने आपण उमेदवारीसाठी तयार झालो. तशी कल्पना काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांना दिली गेली. याच सुमारास दिल्लीतून डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर झाली. प्रभारींशी चर्चा झाल्यानंतर आपला एबी अर्ज घेण्यासाठी प्रतिनिधी १० जानेवारीला सकाळी नागपूरमध्ये प्रदेशाध्यक्षांकडे पोहोचला. त्यास संध्याकाळपर्यंत म्हणजे १० तास बसवून ठेवले गेले. उशिराने पाकिटात दिलेले दोन कोरे एबी अर्ज वेगळय़ाच मतदारसंघाचे असल्याचे लक्षात आले. याची कल्पना दिल्यावर उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाने एबी अर्ज दिला. त्यात पर्यायी उमेदवारासाठी असलेल्या रकान्यात निरंक शेरा मारलेला होता. अशा स्थितीतही आपण काँग्रेसकडूनच अर्ज भरला. पण एबी अर्ज नसल्याने तो अपक्ष उमेदवारीत परावर्तित झाल्याचे तांबे यांनी सांगितले. महाविकास आघाडीकडे पाठिंबा जाहीर करण्याची मागणी केली. सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा केली. त्यावेळी दिल्लीतून जाहीर माफीनामा मागण्यास सांगण्यात आले. ती मागण्याचीही तयारी दर्शविली. १९ जानेवारी रोजी सहप्रभारींना पत्रही दिले. दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अन्य उमेदवारांना पाठिंबा देणार, तांबे परिवाराने धोका दिला, असे आरोप करीत होते. एका बाजूला दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा सुरू असताना प्रदेश नेतृत्वाकडून दुसरीच चाल खेळली गेली, असा आरोप तांबे यांनी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचा हा अंतर्गत प्रश्न असून तो मिटविण्याचा सल्ला दिला होता, परंतु त्याकडे नेतृत्वाने दुर्लक्ष केले.
उपमुख्यमंत्री मोठय़ा भावासारखे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठय़ा भावासारखे असल्याचे सांगत त्यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांचे मार्गदर्शन घेऊन काम करणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले. निवडणुकीत सर्वच पक्ष आणि विविध संघटनांचे समर्थन मिळाले. त्यामुळे मोठय़ा फरकाने विजय मिळाला. आता सर्वाच्या सहकार्याने आपण अपक्ष आमदार म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.