३९४ गावे चिंताग्रस्त

जिल्ह्य़ांत काही भागात पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी अद्याप त्याची प्रतीक्षा आहे. या स्थितीचा परिणाम साचलेल्या पाण्यावर होत आहे. धरण, विहीर, पाणवठय़ातील पाण्याने तळ गाठला असताना जिल्ल्ह्य़ांत बहुतांश ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. मे अखेपर्यंत एकूण ३९४ गावांमध्ये दूषित पाणी आढळले. ग्रामस्थांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

मागील वर्षी शहरालगतच्या एका गावात दूषित पाणीपुरवठय़ामुळे तेथील ३५ हून अधिक ग्रामस्थांची तब्येत अचानक बिघडल्याने संबंधितांना गंगापूर, गिरणारे, दिंडोरी या ठिकाणी हलवत त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले होते. त्या वेळी उठलेला प्रश्नांचा धुरळा कालांतराने आपसूक खाली बसला. दूषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि त्याची तपासणी हा विषय विस्मृतीत गेला. वास्तविक, अशी परिस्थिती उन्हाळा संपत असताना तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रामुख्याने उद्भवते. आधीच तळाला पोहचलेले अविघटनशील पदार्थ पाण्यात कायम राहतात. त्यात पावसाच्या पाण्याचे ओहोळ परिसरातील माती, धूळ सोबत घेत बंधारा, विहीर वा जलाशयात येतात. यामुळे हे पाणी दूषित होण्याचे प्रमाण वर्षभराच्या तुलनेत अधिक असते.

नाशिक जिल्ह्य़ाांत हे प्रमाण १७ टक्के असल्याची माहिती पाणी गुणवत्ता तपासणी अधिकारी सुरेश जाधव यांनी दिली.  दूषित पाण्यामुळे उद्भवणारे साथीचे आजार, वेळोवेळी घडणाऱ्या अशा काही घटनांचा विचार करता गाव पातळीवर पाणी तपासणीचे काम आरोग्य विभागाकडे देण्यात आले आहे. आरोग्य विभागाचे मल्टी पर्पज वर्कर, ग्रामपंचायतचा सुरक्षारक्षक त्याला जलरक्षक म्हणतात. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विहीर, नदी, धरण येथील नमुने घेत तपासणीसाठी पाठवितात. जिल्ह्य़ांत एक हजार ३८२ ग्रामपंचायतींमध्ये जल तपासणीचे काम नियमित होत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. जलरक्षकांवर दररोज पाण्याच्या स्रोतात ब्लीच पावडर टाकून पाणी शुद्धीकरणाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

वास्तविक त्र्यंबक, इगतपुरीसह ग्रामीण भागात कुठल्याच ग्रामपंचायतीत जलरक्षक किंवा आरोग्य विभागाचा कर्मचारी पाण्याची तपासणी करत नाही. पाण्याचे नमुने घेत नाही. दूषित पाण्याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायत किंवा आरोग्य विभागाकडे निवेदन देऊनही परिस्थितीत बदल झालेला नाही.

जून व जुलै महिन्यांत किमान पाणी तपासणी व्हावी जेणेकरून नागरिकांच्या साथीच्या आजारावर नियंत्रण येईल. मात्र आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे.

दोन हजार ३२५ नमुने तपासले

मेअखेर या ग्रामपंचायतीमधून दोन हजार ३२५ नमुने संकलित करत ते सुरगाणा, मालेगाव, चांदवड, येवला, घोटी, कळवण या ग्रामीण रुग्णालयातील जलशुद्धीकरण प्रयोगशाळा तसेच भूजल सर्वेक्षण व आरोग्य विभागाच्या मुख्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. या तपासणीत पाण्यातील गढूळता अर्थात परपॅरा मीटर रींडिग या प्रणालीनुसार यावर लाल, हिरवा रंग याप्रमाणे विविध पत्रकांवर शेरा दिला जातो. उपरोक्त तपासणीत ३९४ गावांमधील पिण्याचे पाणी दूषित असल्याचे निष्पन्न झाले.