नाशिक : मध्यरात्रीपासून शहरासह ग्रामीण भागात सुरू असलेल्या संततधारेने पाणीटंचाईचे संकट दूर होण्यासोबत पेरण्यांच्या कामांना वेग येण्यास हातभार लागणार आहे. शुक्रवारी दिवसभर सुरू राहिलेल्या पावसाने शहरात गटारी, नाले तुडुंब भरून वाहू लागले. हे पाणी गोदापात्रात गेल्याने गोदावरीची पातळी उंचावली. शहरातील बहुतांश रस्ते जलमय झाल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागली. इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा जोर अधिक आहे.

या हंगामात जून महिना पावसाच्या प्रतीक्षेत गेला होता. जुलैच्या प्रारंभी त्याने काही तालुक्यांत अधूनमधून हजेरी लावली. परंतु नंतर तो अंतर्धान पावला. या एकंदर स्थितीत अनेक धरण तळ गाठण्याच्या मार्गावर असताना पावसाचे पुनरागमन झाल्याचे चित्र आहे. नाशिक, इगतपुरी व त्र्यंबकेश्वरसह आसपासच्या भागात पावसाचा अधिक जोर असून नांदगाव, मालेगाव व नांदगावमध्ये तो रिमझिम स्वरूपात आहे. इगतपुरीत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. याच भागात अनेक धरणे असून त्यावर निम्म्या महाराष्ट्राची तहान भागविली जाते.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये जेमतेम २५ दिवस पुरेल इतकाच जलसाठा आहे. इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पावसाने दारणा, मुकणे, भाम, भावली, गंगापूर, गौतमी गोदावरी या धरणात जलसंचय होण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवापर्यंत जिल्ह्यात ६५ टक्के पेरणी झाली आहे.

संततधारेने अन्य भागात रखडलेली पेरणीची कामे मार्गी लागणार आहेत. सलग दहा तासांपासून चाललेल्या संततधारेने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. बहुतांश रस्ते व चौकांतून दिवसभर पाण्याचे लोट वाहत होते. चौकांमध्ये पाणी साचले. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. गटारी व नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यांचे पाणी थेट गोदापात्रात जात असल्याने हंगामात प्रथमच गोदावरी दुथडी भरून वाहू लागली.

नवीन तिडके कॉलनीतील बाजीरावनगर येथे झाड कोसळले. इतरत्र तसा प्रकार घडला नसल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले. द्वारका भागातील जवाहरलालनगर भागात गटारीचे पाणी घरात शिरले. यामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याची तक्रार काँग्रेसचे अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी केली. आधीच्या पावसात जलमय झालेले सराफ बाजार, फूल बाजार व दहीपूल परिसरात या वेळी तशी परिस्थिती निर्माण झाली नाही. त्यास सराफ व्यावसायिकांनी दुजोरा दिला.

नालेसफाईवरून व्यावसायिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. ही कामे झाल्यामुळे पावसात पाणी तुंबले नाही. वाहते राहिले. पावसाळी गटार योजना, गोदा पात्रातील गाळ काढणे व तत्सम कामांवर आजवर शेकडो कोटी रुपये खर्च झाले आहेत. परंतु, प्रत्यक्षात गटारीतील पाण्यामुळे गोदावरीची पातळी वाढल्याकडे देवांग जानी यांनी लक्ष वेधले.