नांदगाव: शहरातून जाणाऱ्या लेंडी नदीची पूर परिस्थिती आणि रेल्वे भुयारी मार्गातील वाहतुकीला अडथळा ठरणारे तसेच उच्च न्यायालयाने पारित केलेल्या आदेशानुसार शहरातील ‘मटण बाजार’ मंगळवारी पोलीस बंदोबस्त आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आला. सात दिवसांपूर्वी गाळेधारक आणि ओटेधारक यांना अंतिम नोटीस बजाविण्यात आली होती. दोन जेसीबीच्या साहाय्याने अंतिम कारवाई करत बाजार नेस्तनाबूत करण्यात आला.
लेंडी नदी पात्रातील फरशी पूल आणि पांचाळ गल्लीतील दुकाने, टपऱ्या देखील या कारवाईत काढण्यात आल्या. आमची रोजी रोटी बंद न करता आम्हाला पर्यायी जागा द्या, मगच मटण मार्केट तोडा, अशी भूमिका गाळेधारकांनी घेतली. मात्र मटण बाजार काढल्यानंतरच पर्यायी जागेचा विषय घेवू, अशी ठाम भूमिका मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी घेत कारवाई पूर्ण केली. गेल्यावर्षी लेंडी नदीला पूर आला होता. नव्याने केलेल्या भुयारी मार्गात पाणी साचल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. शहरात पाणी शिरून अनेकांचे नुकसान झाले होते. मटण बाजारामुळे पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होत असल्याने नगर परिषद प्रशासनाने गाळेधारकांना नोटिसा बजावत बाजार खाली करण्याचे आदेश दिले होते, मात्र गाळेधारकांनी उच्च न्यायालयात दाद मागत या कारवाईला स्थगिती आणली होती. त्यानंतर मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील तांत्रिक समितीने भुयारी मार्गाची पाहणी करून लेंडी नदी पूरपरिस्थितीला मटण बाजार अडथळा ठरत असल्याचा अहवाल दिला होता.
उच्च न्यायालयाने देखील याचिकेवर सुनावणी करत अडथळा ठरणारे मटण मार्केट काढण्याचा आदेश दिला. त्यानुसार नगर परिषद प्रशासनाने अंतिम नोटीस बजावत मंगळवारी मटण बाजार उद्ध्वस्त केले. मुख्याधिकारी धांडे आणि त्यांचे पथक जेसीबी, ट्रॅक्टरसह मटण बाजारात दाखल झाले. ध्वनिक्षेपकाद्वारे गाळेधारकांना सूचना केल्या. अंतिम नोटीस बजावली असून गाळे खाली करा, अतिक्रमण काढतांना अडथळा आणू नका, अन्यथा शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर पंधरा मिनिटांची वेळ देत गाळे खाली करण्यास सांगितले.
नगरसेवक किरण देवरे आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गाळे खाली करण्यासाठी दोन दिवस अतिक्रमण मोहीम पुढे ढकलावी व गाळेधारकांना सहकार्य करावे अशी विनंती केली, मात्र मुख्याधिकारी धांडे यांनी गाळेधारक सहकार्य करत नसल्याने कारवाई करावीच लागेल, अडथळा आणू नका असे सांगत विनंती धुडकावून लावत सहा गाळे आणि २१ ओटे काढत कारवाई पूर्ण केली.
या कारवाईत मटण बाजारातील अनेक गाळेधारक व फरशी पुलावरील टपरीधारक विस्थापित झाले. लोकप्रतिनिधी, गाळेधारक, प्रशासकीय अधिकारी आदींची एक बैठक बोलावून त्यात विस्थापितांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी दिले. कारवाई प्रसंगी पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांचेसह पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.