नाशिक : महाराष्ट्रात अंधश्रध्दा विरोधी कायदा अस्तित्वात असतानाही सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिरात एका ज्योतिषाकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्य बघितल्याच्या कथित प्रकारावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही टीका केली आहे. शिंदे समर्थक मंत्र्यांनी मात्र मुख्यमंत्र्यांनी मंदिरात दर्शन घेतले, ज्योतिषाकडे हात दाखवला नाही, असा दावा केला आहे.  नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले पण ज्योतिष पाहिले नाही असा दावा केला तर, पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी शिंदे स्वत:चे भविष्य तयार करणारी व्यक्ती आहे, तेच भविष्यकाराचे भविष्य सांगतील, अशी मिश्किल प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> बेघरमुक्त महाराष्ट्राचा शिंदे-फडणवीसांचा संकल्प; १०० दिवसांत पाच लाख घरे बांधणार

शिर्डी येथे साईबाबाचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा मुंबई ऐवजी अकस्मात सिन्नर तालुक्यातील मिरगावाकडे वळला. ईशान्येश्वर मंदिरात त्यांनी सपत्नीक दर्शन घेऊन पूजा केली. शासकीय दौऱ्यात हा कार्यक्रम नव्हता. मिरगावचा दौरा गोपनीय ठेवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. या ठिकाणी एका बाबाकडे भविष्य जाणून घेण्यासाठी बडी राजकीय मंडळी नेहमी येतात. मुख्यमंत्र्यांच्या अकस्मात भेटीकडे त्या दृष्टीने पाहिले गेले. अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी मुख्यमंत्री भविष्य बघण्यासाठी तिथे गेल्याचे खरे असल्यास ही अत्यंत बेजबाबदार कृती असल्याचे नमूद केले. पुरोगामी महाराष्ट्रात संवैधानिक पदावरील मुख्यमंत्र्यांच्या कृतीचा महाराष्ट्र अंनिसने निषेध केला. मुख्यमंत्र्यांच्या वर्तनातून चुकीचा संदेश गेल्याचा आक्षेप चांदगुडे यांनी नोंदविला.

हेही वाचा >>> राज्यपालांना हटविण्यासाठी दबाव; उद्धव ठाकरेंचा आंदोलनाचा इशारा, पवारांची कोश्यारींवर टीका

मुख्यमंत्र्यांच्या ईशान्येश्वर मंदिरातील भेटीवरून उठलेले वादळ शमविण्यासाठी शिंदे गटाचे मंत्री मैदानात उतरले. नाशिक दौऱ्यावर असलेले खनिकर्म तथा नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजा केली. देवाचे दर्शन घेणे अंधश्रध्दा नाही. त्यांनी तिथे ज्योतिषाकडून आपले भविष्य बघितल्याच्या चर्चेत कुठलेही तथ्य नाही. हात दाखविण्याचा प्रकार घडला नाही, असा दावा केला. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील पाटील यांनी नंदुरबारमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली. एकनाथ शिंदे स्वत:चे भविष्य तयार करणारी व्यक्ती आहे. त्यामुळे ते कोणाकडेही भविष्य पाहणार नाहीत, अशी आम्हांला खात्री आहे. उलट तेच भविष्यकाराचे भविष्य सांगतील. नेत्याला कोणी कार्यकर्त्यांनी सांगितल्यास नेता तिथे जात असतो. त्यामुळे ते गेलेही असतील, असे त्यांनी सूचित केले.

हेही वाचा >>> बोम्मईंचे वक्तव्य ही भाजपची भूमिका आहे का? : उद्धव ठाकरे

‘शिंदे भविष्य घडवणारे’ 

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले पण ज्योतिष पाहिले नाही असा दावा केला, तर पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी शिंदे स्वत:चे भविष्य घडवणारी व्यक्ती आहे, तेच भविष्य सांगणाऱ्याचे भविष्य सांगतील, अशी प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्र्यांनी हात दाखवायला जाणे पुरोगामी महाराष्ट्रासाठी अयोग्य

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारी कार्यक्रम रदद् करून शिर्डी येथे देवदर्शनाला गेले. देवदर्शनासाठी जाणे हे एकवेळ समजू शकते. मुख्यमंत्री तेथून सिन्नर येथे ज्योतिषाकडे हात दाखवायला गेले अशी चर्चा आहे. माझा जोतिषावर विश्वास नाही. त्यामुळे मी कोठे हात दाखवायला जात नाही. पुरोगामी राज्य असा महाराष्ट्राचा लौकिक आहे. हे नवीन पाहायला मिळते, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. हे सरकार स्थिर की अस्थिर हे सांगायला मी ज्योतिषी नाही. कारण माझा ज्योतिषावर विश्वास नाही. पुरोगामी राज्यात हे सारे नवीन पाहायला मिळत आहे, अशी टीका  पवार यांनी केली. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात. या विषयी काय बोलावे? आम्ही शिर्डी, पंढरपूर येथे गेलो तर दर्शन घेतो. आपली ती परंपरा आहे.  मात्र ज्योतिषाची भेट घेऊन आपले भविष्य पाहाणे हे कितपत योग्य आहे? २१ व्या शतकात जग कुठे चालले आहे, याचा थोडातरी विचार करावा, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला. प्रत्येकाची कोठे ना कोठे निष्ठा असते. विश्वास असतो. त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. मात्र श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी, असे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controversy chief minister irresponsible criticism of superstition eradication committee ysh
First published on: 25-11-2022 at 00:02 IST