धुळे : धुळे महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीनंतर शहरात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. यादीत झालेल्या मोठ्या प्रमाणातील त्रुटींमुळे राज्य निवडणूक आयोगाची बदनामी झाली असून नागरिक आणि संभाव्य उमेदवारांची दिशाभूल झाल्याचा आरोप करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना लेखी निवेदन दिले.संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
स्थायी समितीच्या माजी सभापती किरण कुलेवार यांनी आज दुपारीच प्रारूप मतदार यादीवर आक्षेप घेतला. आयुक्तांची भेट घेऊन यादीतील मतदारांच्या नावांबाबत आक्षेप काय, यासंदर्भात वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर प्रसंगी निवडणूक आयोग आणि न्यायालयाचेही दार ठोकीन असा इशाराही दिला. यामुळे वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तशातच दुपारी शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी याच संभ्रमावस्थेवर आक्षेप घेतले आहेत.
शिवसेनेच्या पत्रकात म्हटल्या नुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप याद्यांमध्ये प्रभाग सीमांकन रेषेतील रहिवास क्षेत्राचा उल्लेखच नाही, तर रेषेबाहेरील मनपा क्षेत्र व अन्य भागांचा समावेश केल्याचे आढळल्याने संताप उसळला आहे. प्रभाग क्रमांक १ ते १९ मधील अत्यंत महत्त्वाची माहिती अपूर्ण असून, हजारो मतदारांची नावे दुबार नोंदविण्यात आली आहेत. अनेक मृत व्यक्तींची नावेही यादीत कायम राहिलेली आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नव्या मतदारांची मोठ्या प्रमाणात नावे वगळली गेली असून त्यामुळे तरुण मतदारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “मतदार यादी तयार करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्धारित नियमांना फाटा दिला आहे. जाणूनबुजून अनेक गोष्टींवर दुर्लक्ष केले गेले असून ही यादी विकत घेतलेल्या उमेदवारांशी तसेच नागरिकांशी अन्याय करणारी आहे.” प्रारूप याद्यांमुळे विविध प्रभागांमध्ये वाद-विवाद निर्माण होण्याची शक्यता वाढली असून निवडणूक प्रक्रिया कलंकित होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. याबाबत शिवसेना (उबाठा) पक्षाने निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या संपूर्ण पथकावर संघटित गुन्हेगारीच्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाची बदनामी, दिशाभूल आणि नागरिकांना झालेला मानसिक त्रास यासंदर्भात तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. शिवाय ही तक्रार थेट राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र तसेच भारत सरकारच्या निवडणूक आयोगाकडेही पाठवत असल्याची माहिती देण्यात आली.शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सौ. भाग्यश्री विसपुते यांची भेट घेऊन या संदर्भातील दप्तरी तक्रार सादर केली. जिल्हाधिकाऱ्यांनी “आपला अभिप्राय महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवत आहोत,” असे सांगितल्याची माहिती बैठकीनंतर देण्यात आली.
या शिष्टमंडळात जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, भरत मोरे, आनंद जावडेकर, अण्णा फुलपगारे, प्रशांत ठाकूर, पिंटू शिरसाठ, कपिल लिंगायत, शिवाजी शिरसाळे, संजय पिंगळे, नितीन देशमुख, विष्णू जावडेकर, निलेश कांजरेकर, अनिल शिरसाट, शुभम रणधीर, अजय चौधरी, सूरज भावसार, सचिन शिंदे, वैभव पाटील, योगेश पाटील, तेजस सपकाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनावर शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांची स्वाक्षरी आहे.
