नाशिक – कोपरगांव-येवला- मनमाड- मालेगाव महामार्ग चौपदरीकरण आणि कॉंक्रिटीकरणासाठी निधी मंजूर करावा. स्थानिक उद्योग, व्यवसाय वाचविण्यासाठी या महामार्गावर उड्डाणपूल न करता शहराच्या बाहेरून वळण रस्ता करावा, अशी मागणी आमदार किशोर दराडे तसेच युवा नेते संकेत दराडे यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
या महामार्गाच्या कामावरून स्थानिक पातळीवर मंत्री छगन भुजबळ आणि दराडे यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे दिसत आहे. या महामार्गासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने निधी मंजूर केल्याकडे लक्ष वेधत सविस्तर प्रकल्प अहवालात येवला शहरात उड्डाणपूल आणि बाह्यवळण रस्त्याचा समावेश करावा, अशी सूचना मध्यंतरी मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला केली होती. आता येवल्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे आणि नेते संकेत दराडे यांनी थेट दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन रस्ते बांधणी व दळणवळणाच्या पायाभूत सुविधांविषयी चर्चा केली. काम सुरु होण्याआधीच नाशिक जिल्ह्यात वादाला सुरुवात झाली आहे. येवल्याचे स्थानिक नेते आमदार किशोर दराडे यांनी येवल्यात उड्डाणपुलास विरोध केला आहे.
केंद्रीय रस्ते मंत्रालयाने महामार्गाच्या चौपदरीकरण आणि कॉक्रिटीकरणासाठी ९८० कोटींचा निधी प्रस्तावित आहे. या निधी अंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल करण्याचे काम सुरू आहे. महामार्गाच्या विस्तारीकरणात येवला शहराच्या अर्थकारणाला व उद्योग-व्यवसायाला धक्का पोहोचू नये यासाठी उड्डाणपूल न करता शहराच्या बाहेरून वळण रस्ता अर्थात बायपास करण्याची मागणी आमदार दराडे यांनी केली. चार राज्यांतील वाहतुकीसाठी हा महत्वाचा रस्ता आहे. वाहनांची संख्या वाढल्याने दररोज वाहतूक कोंडी होते. स्थानिकांना महामार्ग ओलांडताना जीव धोक्यात घालावा लागतो. कोंडीमुळे शहर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचे प्रमाणही वाढल्याने अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली.
अरुंद रस्त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते. शिर्डी आणि पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना बराच काळ तिष्ठत रहावे लागते. या भागात कृषी उत्पन्न बाजार समितीसह प्रमुख बाजारपेठ आहे. येवला, नगरसूल आणि लासलगावमधून किसान रेल्वे तसेच इतर रेल्वेतून मोठ्या प्रमाणात शेतमालाची वाहतूक देशात सर्वत्र होते. शेतमाल वाहतुकीच्या वाहनांची संख्या मोठी आहे. येवल्यात पैठणी खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण गरजेचे आहे. परंतु, वर्दळ टाळण्यासाठी उड्डाण पुलाचा पर्याय चुकीचा ठरेल, यामुळे व्यवसाय मंदावतील. येवला शहराच्या बाजूने वळण रस्ता केल्यास वाहतूक कोंडी कमी होईल आणि व्यवसायालाही धक्का पोहोचणार नाही असेही दराडे यांनी लक्षात आणून दिले. यावर मंत्री गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

