लोकसत्ता प्रतिनिधी नाशिक : ठाकरे गटाने शुक्रवारी नाशिक पश्चिम मतदारसंघासाठी सुधाकर बडगुजर आणि नाशिक मध्यसाठी वसंत गिते हे उमेदवार राहणार असल्याचे निश्चित केल्याने महाविकास आघाडीत बेबनाव झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने पत्रकार परिषद घेत ठाकरे गटाने जिल्ह्यातील १५ ही जागांवर उमेदवार घोषित करावेत, आम्ही त्यांचे झेंडे हातात घेत प्रचार करू, अशी उपहासात्मक टीका केली आहे. शुक्रवारी ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेत बडगुजर आणि गिते यांची नावे निश्चित केल्याने शरद पवार गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असतानाही ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर उमेदवाराची एकतर्फी घोषणा करुन हसू करुन घेतले, असे शरद पवार गटाने म्हटले आहे. ठाकरे गटाचा तोच प्रचंड आत्मविश्वास येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीत अद्याप जागा वाटप झालेले नसतानाही ठाकरे गटातील स्थानिक नेत्यांनी नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम मतदारसंघ लढवण्याची एकतर्फी घोषणा केलीआहे. फक्त शहरातच नव्हे तर, संपूर्ण जिल्ह्यात ठाकरे गटाची प्रंचड ताकद असून त्यांच्याकडे १५ ही मतदारसंघात मातब्बर उमेदवारांची रांग लागली आहे. ते पाहता फक्त दोनच जागांची घोषणा करणे म्हणजे शिवसेना (ठाकरे) गटावर नामुष्की आहे. ती टाळण्यासाठी सर्व १५ विधानसभा जागा ठाकरे गटाने लढवाव्यात, असा टोला शरद पवार गटाने हाणला आहे. आणखी वाचा-रात्रीतून सहा बंदुका, चार तलवारी, चॉपर, गुंगीचे औषधे असा साठा कुठे सापडला? ठाकरे गटाकडून इच्छूक असलेल्यांनी निष्ठेची व्याख्याच बदलून टाकली आहे. काँग्रेस ते शिवसेना नंतर मनसे, पुढे भाजपमार्गे पुन्हा शिवसेना असा काहींचा प्रवास आहे. हे जर एकनिष्ठ असतील तर शिंदे गटात किंवा अजित पवार गटात गेलेले महाविकास आघाडीकडे आले तर त्यांनाही एकनिष्ठच म्हणावे लागेल, असा टोमणा बडगुजर आणि गिते यांना मारण्यात आला आहे. यावेळी शरद पवार गटाकडून ठाकरे गटाच्या १५ उमेदवारांची घोषणा झाली. यामध्ये बडगुजर, गिते यांच्यासह दत्ता गायकवाड, योगेश घोलप आदी पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. या पत्रकार परिषदेस शरद पवार गट ओबीसी सेलचे छबु नागरे, नाशिक शहर जिल्हा सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी यांसह इतर उपस्थित होते.