मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पत्नीचा पोलीस गणवेश परिधान करून तसेच त्याच्यावर स्वतःची नावपट्टी लावत, बनावट ओळखपत्र तयार करुन नागरिकांमध्ये रुबाब करणाऱ्या संशयिताविरोधात महिला पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उज्वला पवार (३७, रा. माऊली लॉन्स ) या मुंबई पोलीस दलात उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांचा विवाह २०१७ मध्ये सागर पवार याच्याशी झाला असून त्यांना एक मुलगी आहे.
हेही वाचा >>> नाशिक : खड्ड्यांविरोधात मनसेचे ढोल वाजवून मडके फोड आंदोलन
संशयित सागर हा पोलीस अधिकारी नसताना देखील पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करुन पोलिसांच्या गणवेशात फिरतो. समाज माध्यमातर पोलिसी गणवेशातील छायाचित्र टाकत असतो. सपोनि (सहायक पोलीस निरीक्षक) आणि पोउनि (पोलीस उपनिरीक्षक) अशी स्वतःच्या नावाने बनावट नावपट्टी तयार करून त्याचा वापर शासकीय कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी करतो. आर्थिक फायदा तसेच दहशत पसरविण्यासाठी वापर करीत असल्याचे उज्वला पवार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी विरोध केला असता संशयिताने त्यांना धमकावत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संशयिताविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.