जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तेजीत असणाऱ्या सोने, चांदीच्या दरांनी आता सर्वकालीन उच्चांक केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण, मध्यपूर्वेतील तणाव तसेच गुंतवणूकदारांचा वाढता कल यामुळे दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये मोठी तेजी पाहायला मिळते आहे. अशा स्थितीत आणखी एका धातुने सध्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले असून, त्याचे स्पर्धात्मक दर सर्वांना आकर्षित करत आहेत.
जळगावसह राज्यभरातील सुवर्ण बाजारपेठेत २४ कॅरेट सोन्याने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ७० हजार रूपयांचा सर्वकालीन उच्चांक केला आहे. दर उच्चांकावर पोहोचल्याने लग्नसराई, सण-उत्सव तसेच शुभकार्यांसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. पूर्वी १० ते २० ग्रॅम वजनाचे दागिने सहज खरेदी करणारे ग्राहक आता वजन कमी करण्यासह खरेदी पुढे ढकलण्याचा निर्णय घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. चांदीच्या दरानेही जीएसटीसह प्रति किलो तीन लाख ८५ हजार रूपयांचा सर्वकालीन उच्चांक केला आहे. त्यामुळे पूजेसाठी लागणारी भांडी, भेटवस्तू तसेच गुंतवणुकीसाठी घेतली जाणारी चांदी महागली आहे.
गेल्या वर्षभरात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये झालेल्या विक्रमी वाढीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. वाढलेल्या दरांमुळे या मौल्यवान धातूंमध्ये थेट गुंतवणूक करणे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी अवघड बनले असून, ते पर्यायी धातूंच्या शोधात आहेत. या पार्श्वभूमीवर, जागतिक बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किमतींनी उच्चांक गाठल्यानंतर आता तांबे (कॉपर) हा धातू गुंतवणूकदारांचा नवा पसंतीचा पर्याय ठरत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलते आर्थिक संकेत, औद्योगिक गरजा आणि हरित ऊर्जेच्या दिशेने सुरू असलेली जागतिक वाटचाल यामुळे तांब्याच्या किमतींना मजबूत आधार मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्याची परिस्थिती पाहता आगामी काळातही तांब्याचे दर स्थिर आणि मजबूत राहण्याची दाट शक्यता आहे.
म्हणून तांब्याचे महत्व वाढले
तांबे हा सर्वांना परवडणारा आणि दीर्घकालीन संधी देणारा धातू म्हणून पुढे येत आहे. तांब्याच्या किमती वाढण्यामागे सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे जागतिक पुरवठ्यावर असलेला सातत्याचा ताण. खाण उद्योगात गेल्या अनेक वर्षांपासून अपेक्षित प्रमाणात गुंतवणूक न झाल्याने नवीन खाणी उभारणे तसेच उत्पादन क्षमता वाढवणे मर्यादित राहिले आहे. परिणामी, मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढू शकलेला नाही. दुसरीकडे, इलेक्ट्रिक वाहने, सौर व पवन ऊर्जा प्रकल्प, ऊर्जा प्रसारण यंत्रणा, बॅटरी तंत्रज्ञान तसेच पायाभूत सुविधा विकासासाठी तांबे अत्यावश्यक मानला जातो. जगभरात नवीकरणीय ऊर्जेच्या प्रकल्पांवर भर दिला जात असल्याने आगामी काळात तांब्याची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, तांबे आता केवळ औद्योगिक वापरापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो गुंतवणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाचा धातू बनत आहे.
शुद्ध तांब्याला आता किती भाव ?
जागतिक बाजारात तांब्याचा भाव सध्याच्या घडीला ५.९७२ डॉलरवर व्यवहार करत आहे. देशांतर्गत बाजारातही शुद्ध तांब्याचा भाव २००० ते २२०० रूपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. मोड म्हणून विकल्या जाणाऱ्या जुन्या तांब्याला सुद्धा अलीकडे एक हजार रूपयांचा भाव मिळू लागला आहे. गुतवणुक म्हणून अनेक जण तांब्याचे बार खरेदी करत आहेत. एकूणच, सोने आणि चांदीच्या वाढत्या किमतींमुळे निर्माण झालेल्या मर्यादांच्या पार्श्वभूमीवर तांबे हा गुंतवणूकदारांसाठी विश्वासार्ह पर्याय म्हणून पुढे येत आहे. पुरवठ्यातील कमतरता आणि भविष्यातील वाढती मागणी पाहता, तांब्याचे महत्त्व आगामी काळात अधिक वाढेल, असा अंदाज बाजार विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.

