scorecardresearch

दिवाळीनंतर करोनो बाधित रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता, लोकांनी काळजी घ्यावी – आरोग्यमंत्री राजेश टोपे

तिसऱ्या लाटेची सध्या शक्यता नाही, लसीकरणाबाबत केंद्राच्या मिशन ‘कवच कुंडल’ मध्ये महाराष्ट्राचा मोठा सहभाग

Rajesh-Tope
आरोग्यमंत्री राजेश टोपे (संग्रहीत छायाचित्र)

करोनाची दुसरी लाट पुर्णपणे संपली नसली तरी करोना रुग्णसंख्या खूप कमी झाली असून ती एका पातळीवर स्थिरावली आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता सध्या तरी दिसत नसली तरी लोकांनी लस घ्यावी, पुर्ण काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. नाशिकमध्ये जिल्हयातील करोना स्थितीबाबत आढावा आरोग्यमंत्र्यांनी आज घेतला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदमध्ये राज्यातील करोना स्थिती आणि लसीकरण याबाबत भाष्य केलं.

राज्यात दिवाळीनंतर करोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांचा टास्क फोर्स आणि या विषयातील तज्ञ या सर्व लोकांनी ही शक्यता वर्तवली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली. राज्यात लसीकरण वेगाने होत असून आत्तापर्यंत ७० टक्के लोकांना किमान एक लस देण्यात आल्याची माहिती टोपे यांनी पत्रकार परिषदमध्ये दिली. राज्यातील ३५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचे लशीचे दोन डोस झाले आहेत. सुमारे ९.५० कोटी नागरीकांना लस देण्यात आली आहे. आणखी २.५ कोटी लसीकरण झाले तर राज्यात १०० टक्के लसीकरण होईल असा दावा टोपे यानी यावेळी केला. केंद्राची परवानगी मिळताच लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

ज्या ठिकाणी लसीकरण झालं आहे त्या ठिकाणी करोनामुळे होणाऱ्या मृत्युंची संख्या घटली आहे. मुंबई सारख्या शहरांत ८० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झालं असल्यानं मुंबईत करोनामुळे होणारे मृत्यु हे शुन्यावर आले आहेत, रुग्णसंख्याही घटली आहे. लसीकरण हाच उपाय आहे. पाऊस आणि शेतीची कामे यांमुळे मराठवाड्यात लसीकरणाचा वेग कमी झाला होता, आता पुढे गती घेईल अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. केंद्र सरकारच्या मिशन ‘कवच कुंडल’ या लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राचा मोठा सहभाग असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-10-2021 at 15:21 IST
ताज्या बातम्या