राज्यातील पहिलाच प्रयोग नाशिक जिल्ह्य़ात

नाशिक : करोना लसीकरणाची आकडेवारी वाढत असतांनाच अनेकांच्या मनात अजूनही लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या सुईची भीती आहे. त्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण यशस्वी करण्यासाठी ‘सुईमुक्त’ लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. राज्यात अशा प्रकारचा हा पहिला प्रयोग नाशिक जिल्ह्यात होणार असून त्यास कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वाचे लक्ष आहे.

करोना प्रतिबंधात्मक ‘झायडस’ कंपनीची लस आता शासनामार्फत दिली जाणार आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोना लसीकरणाचे काम करणाऱ्या आरोग्य सेविकांचे प्रशिक्षण जिल्हास्तरावर घेण्यात आले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सुईविरहीत लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी सुरज मांढरे

आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनानुसार जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यालयामार्फत जिल्हा प्रशिक्षण केंद्रामध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

झायडस कंपनीने ‘फार्माजेट’ हे साधन तयार केले असून त्याद्वारे लस दिली जाणार आहे. हे लसीकरण सुईमुक्त असून आतापर्यंत एकही लस न घेतलेल्या व्यक्तींना ती दिली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जागतिक आरोग्य संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी डॉ. प्रकाश नांदापूरकर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कैलास भोये यांनी आरोग्यसेविकांना मार्गदर्शन केले. ज्यांनी अद्याप लस घेतलेली नसेल त्यांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

त्यासाठी हा पर्याय

करोना नियंत्रणात येऊ लागल्यावर सरकारने र्निबध टप्प्याटप्प्याने उठविण्यास सुरुवात केली. त्यामुळे करोनाविषयीची भीती कमी होऊन नागरिकांकडून लसीकरणाकडे पाठ फिरविण्यात आली. नंतर केंद्रांवर लसींचा साठा अधिक प्रमाणात उपलब्ध होऊनही त्या ठिकाणी नागरिक फिरकत नसल्याचे चित्र दिसू लागले. तर इच्छा असूनही लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या सुईची भीती वाटत असल्याने अनेक जण लसीकरणासाठी टाळू लागले. त्यासाठी आता हा पर्याय पुढे आला आहे.