पेठ, सुरगाणा करोनामुक्त

नाशिक : करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरत असून जिल्ह्यात सोमवारी ११४ नवीन रुग्ण आढळले. याच दिवशी ११८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. दोन दिवसात सहा जणांचा मृत्यू झाला. पेठ आणि सुरगाणा हे दोन तालुके करोनामुक्त झाले आहेत.

नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये ६० जण ग्रामीण भागातील असून ५३ जण नाशिक शहर तर एक मालेगाव मनपा क्षेत्रातील आहे. जिल्ह्यात सध्या अडीच हजारहून अधिक सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. यात नाशिक शहरात १२५० तर ग्रामीण भागात ११६९, मालेगाव महपालिका क्षेत्रात ८७ आणि जिल्ह्याबाहेरील १५ जणांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

सद्यस्थितीत नाशिक तालुक्यात १४७, बागलाण ६७, चांदवड ७८, देवळा २०, दिंडोरी ८९, इगतपुरी २१, कळवण २६, मालेगाव १०४, नांदगाव ७२, निफाड १८०, सिन्नर ३४९, त्र्यंबकेश्वर पाच, येवला १५ असे रुग्ण आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९७.२५ टक्के आहे.

नाशिक ग्रामीणमध्ये ९६.२५ टक्के, नाशिक शहरात ९७.७४, मालेगाव ९६.४७ तर जिल्हा बा रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.४० टक्के आहे. आजपर्यंत तीन लाख ९४ हजार ८० बाधितांपैकी तीन लाख ८३ हजार २२६ रुग्ण बरे झाले. करोनामुळे आतापर्यंत आठ हजार ३३३ रुग्णांचा मृत्यू झाला. यात नाशिक शहरातील ३८७४, मालेगाव महापालिका क्षेत्रात ३५५, नाशिक ग्रामीणमधील ३९८७ आणि जिल्ह्याबाहेरील १२६ जणांचा समावेश आहे.