करोनाविषयीच्या निष्काळजीपणात वाढ

नाशिक : शहरात करोनाबाधितांची संख्या वाढत असताना

दुसरीकडे नागरिकांमधील निष्काळजीपणादेखील वाढत असल्याचे महापालिका, पोलीस यांच्यामार्फत चाललेल्या संयुक्त कारवाईतून दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी अनेकांना मुखपट्टी परिधान करण्याचा विसर पडला आहे. दंडात्मक कारवाई करूनही मुखपट्टी परिधान न करणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. काही सुशिक्षित मंडळी मुखपट्टी हनुवटीला लटकवून भ्रमंती करतात. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात हा निष्काळजीपणा हातभार लावत आहे.

दिवाळीच्या आधी काहीअंशी आटोक्यात आलेली करोनाची स्थिती पुन्हा एकदा बदलत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात प्रतिदिन १८५ ते २६२ च्या दरम्यान रुग्ण आढळत आहेत. दिवाळीच्या काळात करोनासंबंधीच्या नियमांकडे जे दुर्लक्ष झाले, त्याची पुनरावृत्ती पुढेही कायम असल्याचे दिसत आहे. सद्य:स्थितीत शहरात दीड हजार रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत शहरात करोनाचे सुमारे ६७ हजार रुग्ण आढळले. त्यातील ६४ हजार ४९० करोनाचे रुग्ण उपचाराअंती बरे झाले. तर ९०६ रुग्णांचा मृत्यू झाला. प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ७१८ च्या घरात गेली आहे. ही स्थिती करोनाचे सावट दूर झाले नसल्याचे दर्शवत असली तरी नियमांचा अव्हेर करण्याकडे अनेकांचा कल असल्याचे महापालिकेच्या कारवाईतून निदर्शनास येते. मुखपट्टी परिधान न करणारे किमान ५० ते ७० जण दररोज आढळतात. वारंवार आवाहन, दंडात्मक कारवाई करूनही मुखपट्टी वापराबाबत सजगता दिसून येत नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पालिका, पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू आहे.

मुखपट्टी परिधान न केल्यावरून एकाच दिवसात ६९ जणांवर कारवाई केली. महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मुखपट्टी परिधान न करणारे आतापर्यंत ३२९० जणांवर कारवाई केली गेली आहे. संबंधितांकडून सहा लाख ५८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. थुंकीबहाद्दराची वेगळी स्थिती नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या ४६ जणांवर कारवाई करून प्रत्येकी हजार रुपये असे एकूण ४६ हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आल्याचे महापालिकेच्या उपायुक्त डॉ. कल्पना कुटे यांनी सांगितले.

पोलिसांनी करोनाचे नियम न पाळणाऱ्यांना थेट न्यायालयात हजर करण्याचे धोरण अवलंबले आहे. न्यायालयाने विविध कलमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी २३ जणांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पोलीस यंत्रणेकडून अव्याहतपणे कारवाई सुरू असली तरी अनेकांकडून नियमांचा अव्हेर करण्यात धन्यता मानली जाते. मुखपट्टी परिधान न करणे, सुरक्षित अंतराच्या पथ्याकडे दुर्लक्ष करण्याची ही कृती शहरवासीयांसाठी त्रासदायक ठरल्याचे दिसत आहे.

अनेकांकडून शोभेपुरताच मुखपट्टीचा वापर

अनेकांना मुखपट्टीचा विसर पडला आहे. दंडात्मक कारवाईमुळे नियमांचे पालन प्रभावीपणे होण्याची अपेक्षा होती. परंतु, तसे घडले नाही. उलट नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मुखपट्टी हनुवटीला अडकवून भ्रमंती करणाऱ्यांची कमतरता नाही. जॉगिंग ट्रॅक, बाजारपेठेत ती शोभेपुरती अडकवणारे अनेक जण आढळतात. पथकांना दिसलेल्या अशा व्यक्तींना समज दिली जात असल्याचे पालिका उपायुक्त डॉ. कल्पना कुटे यांनी सांगितले. कारवाईच्या कचाट्यात न सापडलेले अनेक महाभाग सर्वत्र दिसतात.