विधिमंडळ समितीकडून प्रशंसा

नाशिक : करोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीतही आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे उत्तम कार्य करण्यात आल्याची प्रशंसा विधिमंडळ अनुसूचित जमाती समितीतर्फे करण्यात आली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात झालेल्या  बैठकीत समितीकडून विद्यापीठास काही सूचनाही करण्यात आल्या.

समिती सदस्य दौलत दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. दरोडा यांनी विद्यापीठात शासन निधीतील आस्थापनेत अनुसूचित जमातींकरीता असलेल्या रिक्त जागांवर त्वरीत मनुष्यबळ घेण्याविषयी कार्यवाही करावी, अनुसूचित जमातीतील करोनामुळे मृत्यू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर घेण्यासाठी कार्यवाही करावी, विद्यापीठाच्या विविध योजना, उपक्रम यांत अनुसूचित जमातीतील व्यक्तींना प्राधान्य असावे, शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे बिंदुनामावली आणि अनुशेष भरतीबाबत सकात्मक निर्णय घेऊन त्याबाबत अहवाल सादर करावा, अशी सूचना के ली.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सादरीकरणाव्दारे विद्यापीठाच्या कामकाजाची, सद्यस्थितीतील मनुष्यबळाची माहिती दिली. विद्यापीठाचे विविध उपक्रम, संलग्नित महाविद्यालयातील अनुसूचित जमातीतील शिक्षकांची संख्या, रिक्त जागा याबाबत विद्यापीठाकडून वेळोवेळी काम करण्यात येत असून याबाबत कार्यवाहीसाठी संलग्न महाविद्यालयांना विद्यापीठाकडून कळविण्यात येते, असे त्यांनी नमूद के ले.

अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी विद्यापीठाने विविध उपक्रमात त्यांचा प्राधान्याने सहभाग घेणे गरजेचे आहे. विद्यापीठातील मुनष्यबळ आणि रिक्त जागांबाबत भरती प्रक्रियेची कार्यवाही त्वरीत करावी, कर्मचाऱ्यांची बढती, भरती, आरक्षण, अनुशेष, जात पडताळणी याबाबतही  विद्यापीठाकडून माहिती घेण्यात आली.  बैठकीस समिती सदस्य शिरिष चौधरी, राजकुमार पटेल, किरण सरनाईक, रमेश पाटील, राजेश पाडवी, अनिल पाटील, श्रीनिवास वनगा, डॉ. तुषार राठोड, अमरनाथ राजूरकर या आमदारांसह मंत्रालयातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग उपसचिव राजेश तारवी, अवर सचिव मोहन काकड, प्रकल्प अधिकारी विकास मीना, अप्पर आयुक्त संदीप गोलाई उपस्थित होते.