जळगाव : बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपावरून शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) माजी महापौर ललित कोल्हे गेल्या महिनाभरापासून नाशिक कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान, कोल्हे यांनी मुलाच्या जळगावमधील लग्न कार्यासाठी १५ दिवसांचा अंतरिम जामीन मिळावा म्हणून दाखल केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांना जळगाव शहरालगतच्या ममुराबाद रस्त्यावर असलेल्या माजी महापौर कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर बोगस कॉल सेंटर चालविले जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे २८ सप्टेंबर रोजी एल. के. फार्महाऊसवर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान पोलिसांना एकूण ३१ लॅपटॉप तसेच कॉल सेंटर चालविण्यासाठी वापरली जाणारी अत्याधुनिक उपकरणे मोठ्या प्रमाणात आढळली होती.
प्राथमिक चौकशीत हे कॉल सेंटर परदेशी नागरिकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले. कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवून विविध ऑफर्स, डेटाची तपासणी किंवा सेवांच्या नावाखाली विदेशी नागरिकांकडून पैसे उकळत होते. पोलिसांना दोन लॅपटॉपमध्ये झालेल्या आर्थिक व्यवहारांचे ठोस पुरावेही हाती लागले असून, त्यानुसार पुढील तपास सुरू आहे.
ऑनलाईन फसवणुकीसाठी बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपांवरून माजी महापौर कोल्हे यांच्यासह आठ जणांवर संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी विविध पातळ्यांवर चौकशी गतीने सुरू आहे. सध्या कोल्हे नाशिक कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहेत. आणि येत्या २५ नोव्हेंबरला मुलाचे लग्न असल्याने त्यांनी १५ दिवसांसाठी अंतरिम जामिन मिळण्याकरीता अर्ज दाखल केला होता.
सदर अर्जावर झालेल्या सुनावणीदरम्यान कॉल सेंटर चालविण्यात संशयितांना विदेशातून कोणी मदत करत होते का, याचा तपास अद्याप सुरू आहे. तसेच या गुन्ह्याशी संबंधित मुख्य सूत्रधार आणि इतर सहकारी यांचा शोध घेण्यासाठी इंटरपोलची मदत घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी न्यायालयाला सांगितले.
दरम्यान, सरकार पक्षातर्फे सहाय्यक संचालक तसेच गृह विभागाच्या सरकारी अभियोक्ता संगीता ढगे यांनी न्यायालयात बाजू मांडताना ललित कोल्हे आणि त्यांच्या साथीदारांनी केलेला बोगस कॉल सेंटरचा गुन्हा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे. संशयितांवर संघटित गुन्हेगारीची गंभीर कलमे लागू आहेत. मुलाच्या लग्नासाठी अंतरिम जामीन मागणारे कोल्हे यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे नोंद असल्याचे नमूद करून त्यांच्या अर्जाला ठाम विरोध दर्शविला.
दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पोलीस आणि सरकार पक्षाची बाजू ग्राह्य धरून कोल्हे यांनी दाखल केलेला अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कोल्हे यांना जळगाव कारागृहात हलविण्याची प्राथमिक तयारी करण्यात आली होती. मात्र, जळगावमधील कैद्यांची संख्या मोठी असल्याने जागेअभावी त्यांना थेट नाशिक कारागृहात पाठवण्यात आले. तेव्हापासून कोल्हे नाशिक कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहेत.
