समर ऋषिकेश क्रिकेट स्पर्धा

मुंबई सिंध अकादमीने नाशिक क्रिकेट अकादमी आयोजित ‘समर ऋषिकेश चषक २०१६’ स्पर्धेत एनसीए कोल्टसवर ४८ धावांनी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत आठ मार्च रोजी मुंबई सिंध अकादमीचा सामना नाशिक क्रिकेट अकादमी संघाबरोबर होईल.

सिंध अकादमीच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर हर्ष टंक व कुशल शहा यांनी ७० धावांची सलामी दिली. त्यानंतर राहुल रत्नपारखी व सोहम गज्जरच्या फिरकीसमोर डाव १९१ धावांवर गारद झाला. सिंधकडून हर्ष टंक ४०, कुशल शहा ३० तर विराज यादवने ४१ धावा केल्या. रत्नपारखीने चार, सोहम गज्जरने दोन बळी घेतले.

१९२ धावांचे विजयी ध्येय समोर असणाऱ्या एनसीए कोल्टची सुरूवात वाईट झाली. मागील दोन सामन्यात चांगली कामगिरी करणारा प्रथमेश शिंदे पहिल्याच षटकात झेल बाद झाला. त्यानंतर नाशिकचे दोन खेळाडू झटपट बाद झाल्याने कोल्टसची धावसंख्या तीन बाद ३० झाली. प्रणव पवार (२७) व कर्णधार अमित पाटील यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. ५९ धावा करून कर्णधार पाटील बाद झाला त्यावेळी कोल्टसची धावसंख्या १२३ होती. त्यानंतर प्रतिकसिंग व पुनित त्रिपाठी (प्रत्येकी तीन बळी) यांच्या गोलंदाजीवर कोल्टसचा संघ अवघ्या १४४ धावांवर गारद झाला. सिंध संघाकडून अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या प्रतिक सिंग यास सामनावीर घोषित करण्यात आले.