नाशिक – संपूर्ण महाराष्ट्रात पैठणीसाठी प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात अष्टपैलु क्रिकेटपटू युसुफ पठाण नऊ एप्रिल रोजी येणार आहे. येवल्यासारख्या लहानशा शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटपटू येणार असल्याने संपूर्ण येवला तालुक्यात एकच चर्चा आहे. युसुफ पठाण येवल्यात येण्यामागेही विशेष कारण आहे.
येवला शहर आपली विशेष ओळख जपून आहे. पैठणी ही तर एक ओळख आहेच. याशिवाय, येवल्यातील पतंगोत्सव, रंगपंचमीला होणारे रंगांचे सामने, येवल्यातील दिवाळी, येवल्याचा चिवडा अशा विविध कारणांसाठी येवला प्रसिध्द आहे. कुस्तीपटूंचे गाव येवला, अशीही येवल्याची प्रसिध्दी आहे. अशा या येवल्यात माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून भुजबळ ब्रिगेडच्या वतीने ‘येवला प्रीमियर लीग २०२६’ (वायपीएल) या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा महाअंतिम सामना व समारोप सोहळा ९ एप्रिल रोजी सायंकाळी ७:०० वाजता गोशाळा मैदान, येवला येथे होणार आहे.
आयपीएलच्या धर्तीवर माजी खासदार समीर भुजबळ यांच्या संकल्पनेतून वायपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. २९ मार्च रोजी दिमाखदार सोहळ्याने स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीपासूनच अत्यंत दर्जेदार नियोजन, उत्कृष्ट मैदान व्यवस्था आणि खेळाडूंच्या दमदार कामगिरीमुळे क्रिकेटप्रेमी आणि येवलेकरांनी या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला. यामध्ये येवला मतदारसंघातील तब्बल १६ संघांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संपूर्ण येवला तालुक्यात या स्पर्धेची मोठी चर्चा रंगली आहे. क्रिकेटप्रेमींसाठी ही स्पर्धा म्हणजे एक प्रकारचा महारणसंग्राम ठरला असून, अंतिम सामन्यात रोमांचक आणि थरारक लढतीची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. येवला शहरासह संपूर्ण तालुक्यात या स्पर्धेने मोठे आकर्षण निर्माण केले आहे.
अंतिम सामन्यात क्रिकेटचा थरार शिगेला पोहोचणार असून, प्रेक्षकांना एक रोमांचक लढत अनुभवायला मिळणार आहे. या सोहळ्यास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे तर उपस्थित राहणार आहेतच. शिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू युसुफ पठाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांचा गौरव करण्यात येणार आहे. समारोप सोहळ्याचे अजून एक आकर्षण म्हणजे गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा विशेष मनोरंजनात्मक कार्यक्रम. त्यांच्या सादरीकरणामुळे उपस्थित प्रेक्षकांना संगीताचा सुरेल आनंद अनुभवायला मिळणार आहे. भुजबळ ब्रिगेडच्या वतीने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून, युवा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आणि क्रीडा संस्कृतीला चालना देण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
