सुरेंद्र शेजवळ हत्येच्या पाश्र्वभूमीवर राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची चर्चा

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून इच्छुक असलेले सुरेंद्र शेजवळ या ‘बाहुबली’च्या हत्येनंतर नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा एकदा गुन्हेगारी हा कळीचा मुद्दा ठरेल, अशी चिन्हे आहेत. महापालिकेच्या मागील निवडणुकीत नाशिककरांची नाडी बरोबर ओळखून त्याप्रमाणे प्रचाराची व्यूहरचना आखत वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा जोरकसपणे मांडणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिककरांनी भरभरून मतांचे दान दिले होते, पण मनसेही आता त्याला अपवाद ठरलेली नाही. पाच वर्षांनी पालिका पुन्हा एकदा मतदानास सामोरी जात असताना विकास कामांना दुय्यम स्थान मिळत आहे. शेजवळ यांच्यामुळे भाजपप्रमाणेच शिवसेनाही गुन्हेगारांना पक्षात प्रवेश देत असल्याची ओरड होऊ लागली आहे.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी याआधीच्या पालिका निवडणूक प्रचारात नाशिककरांवर गारूड केले होते. नाशिककरांच्या मनातील मुद्दे त्यांच्याकडून प्रचारात मांडण्यात येत होते. त्यात शहरातील वाढत्या गुन्हेगारीचाही समावेश होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे गुन्हेगारांना प्रोत्साहत देत असल्याचा जाहीर सभांमधून थेट आरोप करून त्यांनी प्रचाराची दिशाच बदलून टाकली होती. भाजपकडूनही राष्ट्रवादीवर तसेच आरोप झाले, परंतु नाशिककरांनी मनसेच्या बाजूने कौल दिला. वास्तविक, गुन्हेगारी हा राज्य सरकारशी संबंधित विषय असतानाही पालिका निवडणुकीत त्याचा राज यांनी खुबीने वापर करून घेतला होता.

पाच वर्षांनंतर चक्र फिरून पालिका निवडणुकीत गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा चर्चेत राहण्याची चिन्हे आहेत. मागील निवडणुकीत आपल्यावर झालेल्या गुन्हेगारीच्या आरोपांमुळे बदनाम झालेला राष्ट्रवादी या वेळी उट्टे काढण्याच्या मानसिकतेत असून, भाजप गुन्हेगारांना कसे पक्षात स्थान देत आहे, यावर काँग्रेसकडून प्रचारात भर देण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री सुरेंद्र शेजवळ या शिवसेनेकडून उमेदवारीसाठी इच्छुकाची भररस्त्यात तलवार, चॉपर यासारख्या हत्यारांचे वार करून चार जणांनी हत्या केल्याने राजकारण आणि गुन्हेगारीकरण हा विषय ऐन निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

भाजपने काही महिन्यांपूर्वी पोलिसाच्या हत्येसह अनेक गुन्हे दाखल असलेल्या पवन पवार या नगरसेवकास पक्षात स्थान देत पावन करून घेतले. इतरही काही लहान-मोठय़ा गुन्हेगारांना पक्षात घेण्याचे प्रकार सुरूच राहिले. गुन्हेगारांना उमेदवारी देण्यात येणार नसल्याची सारवासारव स्थानिक पातळीवर भाजपकडून करण्यात येत असली तरी गुन्हेगारांना पक्षात प्रवेशच कसा दिला जातो, या मुद्दय़ावर मात्र बोलणे टाळले जाते. पवनच्या भाजप प्रवेशानंतर शिवसेनेने तोंडसुख घेताना भाजप गुन्हेगारांना कसा जवळ करीत आहे, याकडे लक्ष वेधले होते. परंतु गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सुरेंद्र शेजवळला अलीकडेच पक्षात घेऊन शिवसेनेने आपणही वेगळे नसल्याचे दाखवून दिले. पवन पवार ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतो, त्या प्रभागातून सुरेंद्र उमेदवारीसाठी इच्छुक होता. शिवसेनेच्या मुलाखती सुरू होण्याआधीच त्याची अशा प्रकारे हत्या झाली. पोलिसांकडून या हत्येचे कारण पूर्ववैमनस्य असे दिले जात असले तरी ऐन निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर हत्या झाल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत.

मागील निवडणुकीत गुन्हेगारीविरोधात राष्ट्रवादीवर टीका करणारे राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये अलीकडेच सिडकोतील एका गुंडाने प्रवेश केला. त्यामुळे मनसे आता गुन्हेगारीवर कशी बोलणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आर्थिक गैरव्यवहारांमुळे छगन भुजबळ, देवीदास पिंगळे तसेच बनावट नोटा छपाई प्रकरणात पदाधिकारी छबू नागरे अशी मंडळी अडकल्याने सैरभैर झालेल्या राष्ट्रवादीने गुन्हेगारीचा मुद्दा प्रचारात वापरणार असल्याचे म्हटले आहे. नाशिककरांची सुरक्षितता हा विषय केवळ निवडणुकांपुरताच नव्हे, तर कायमच पक्षाकडून मांडण्यात येईल, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी नमूद केले आहे. नागरिकांची सुरक्षितता हा विषय महत्त्वाचा असून या विषयाला राजकीय वळण देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीशी चार ते पाच जागांमुळे आघाडीचे घोडे अडून बसलेल्या काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर यांनी भाजपवर सडकून टीका करताना गुन्हेगारांना बळ देण्याचे काम भाजपच्या काळात होत असल्याचा आरोप केला. राजकारणाचे गुन्हेगारीकरण भाजपने केले असून सुरेंद्र शेजवळची नुकतीच झालेली हत्या, तसेच लूटमार, चोऱ्या, हाणामाऱ्या, सोनसाखळी हिसकाविणे या प्रकारांनी नाशिककर हैराण झाले असून या विषयावर साधनशुचितेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपचे नेते विरोधात बोलण्याऐवजी त्याचे समर्थन करीत असल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

  • भाजपने काही महिन्यांपूर्वी पोलिसाच्या हत्येसह अनेक गुन्हे दाखल असलेल्या पवन पवार या नगरसेवकास पक्षात स्थान देत पावन करून घेतले. गुन्हेगारांना उमेदवारी देण्यात येणार नसल्याची सारवासारव स्थानिक पातळीवर भाजपकडून करण्यात येत असली तरी गुन्हेगारांना पक्षात प्रवेशच कसा दिला जातो, या मुद्दय़ावर मात्र बोलणे टाळले जाते.
  • गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सुरेंद्र शेजवळला अलीकडेच पक्षात घेऊन शिवसेनेने आपणही वेगळे नसल्याचे दाखवून दिले. पवन पवार ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतो, त्या प्रभागातून सुरेंद्र उमेदवारीसाठी इच्छुक होता. शिवसेनेच्या मुलाखती सुरू होण्याआधीच त्याची हत्या झाली.

गुन्हेगारांना बळ देण्याचे काम भाजपच्या काळात होत आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण भाजपने केले असून वाढत्या गुन्ह्य़ांमुळे नाशिककर हैराण झाले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचारात हा मुद्दा नक्कीच मांडण्यात येईल.

शरद आहेर, काँग्रेस, शहराध्यक्ष

नाशिककरांची सुरक्षितता हा विषय राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा आहे. केवळ निवडणूक प्रचारासाठीच नव्हे, तर ज्या ज्या वेळी नागरिक असुरक्षित असतील, त्या प्रत्येक वेळी राष्ट्रवादी हा विषय मांडेल.

रंजन ठाकरे, राष्ट्रवादी, शहराध्यक्ष