नाशिक : “नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला” असे गुन्हेगारांकडून वदवून घेणाऱ्या नाशिक शहर पोलिसांचा दबदबा पुन्हा एकदा कमी झाल्याचे महापालिका निवडणुकीनंतरच्या घडामोडींवरुन दिसत आहे. महापालिका निवडणुकीनंतर गुन्हेगारांकडील कोयते, तलवारी पुन्हा बाहेर आल्या आहेत. सिडको, सातपूर, कामगारनगर नंतर आता पंचवटीतील म्हसरुळ भागातही गुंडगिरी वाढली आहे. विनयभंग, लुटमार, कोयत्याचे वार असे प्रकार पुन्हा घडू लागल्याने कायद्याचा बालेकिल्ला ढासळू लागला आहे. म्हसरुळ येथील एका प्रकारामुळे दुकानदार, व्यावसायिक भयभीत झाले आहेत.

मागील वर्षी वाढत्या गुन्हेगारीमुळे बिघडलेली प्रतिमा सावरण्यासाठी शहर पोलिसांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार मोहीम राबवित गुंडांना सळो की पळो करुन सोडले होते. विशेष म्हणजे, ही कारवाई करताना राजकीय गुन्हेगारांचाही पोलिसांनी मुलाहिजा न ठेवल्याने शहर पोलिसांचे नाशिकच्या नागरिकांकडून कौतुक करण्यात येऊ लागले होते. काही ठिकाणी जाहीपरणे तसे फलकही लागले होते. परंतु, महापालिका निवडणूक संपल्यानंतर पुन्हा एकदा गुंडगिरी फोफावू लागली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

वाढत्या गुन्हेगारीचा असाच एक प्रकार पंचवटीत घडला. म्हसरूळ परिसरात दिंडोरी लिकर्स नावाचे दुकान आहे. दुकानात करण हिवराळे (३४) हे कामास आहेत. हिवराळे यांनी म्हसरुळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार २३ फेब्रुवारी रोजी दुपारी करण हिवराळे दुकानात काम करीत असताना युवराज सोनवणे (३७, रा. बोरगड), आकाश गायकवाड (२१, रा. म्हसोबावाडी) आणि सोनु शेवरे (२३, रा. म्हसोबावाडी) हे दुकानात आले. त्यांनी बिअर विकत घेतली. परंतु, संपूर्ण पैसे दिले नाहीत. कमी पैसे दिल्याने हिवराळे यांनी त्याबाबत त्यांना विचारले. सर्व पैसे देण्याची विनंती केली. त्याचा तिघांना राग आला. त्यांनी हिवराळे हेच दुकानाचे मालक आहेत, असे समजून त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने दगड मारला. दगड लागल्याने हिवराळे गंभीर जखमी झाले. गुंडांनी दुकानावर दगडफेकही केली. त्यामुळे दुकानाचे नुकसान झाले. आमच्या नादाला कोणी लागायचे नाही. हा आमचा भाग आहे. इथे आमचेच चालणार, असे धमकावत टोळक्याने परिसरात दहशत माजवली. हिवराळे यांच्या तक्रारीनंतर म्हसरुळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

म्हसरूळ हद्दीत काही दिवसांपासून चोरी आणि मारहाणीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याआधीही याच परिसरात अशाच प्रकारच्या टोळी युद्धाच्या आणि लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. दुकानावरील दगडफेक प्रकरणातील मुख्य संशयित युवराज सोनवणे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मकोका, खुनाचा प्रयत्न, चोरी, आर्म्स ॲक्ट आणि मारहाणीचे तब्बल ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. घरफोडी, तोडफोड, दमदाटी, शांतता भंग यासारखेही गुन्हे युवराज सोनवणेविरुध्द दाखल आहेत. एवढा गुन्हेगारी इतिहास असतानाही त्याने पुन्हा एकदा भरवस्तीत दहशत माजविण्याची हिंमत केल्याने युवराज सोनवणेवर एखाद्या राजकीय नेत्याचा वरदहस्त आहे की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.