गुन्हेगारांची दहशत

शहरात गुन्हेगारी टोळक्यांचा धुडगूस सुरूच असल्याच्या बुधवारच्या  हत्या प्रकरणाने सिद्ध झाले आहे. 

crime case, man killed
प्रातिनिधीक छायाचित्र

तिघांच्या हत्येप्रकरणी नऊ संशयित ताब्यात

बुधवारी रात्री काही तासांच्या अंतरात तीन युवकांची हत्या झाल्यामुळे शहरातील वाढत्या गुन्हेगारीचा विषय पुन्हा चव्हाटय़ावर आला आहे. त्यांच्या दहशतीने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हत्ये प्रकरणांत पोलिसांनी एकूण नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. इतर फरारी संशयितांचा शोध सुरू आहे.

शहरात गुन्हेगारी टोळक्यांचा धुडगूस सुरूच असल्याच्या बुधवारच्या  हत्या प्रकरणाने सिद्ध झाले आहे.  राजाश्रय लाभल्याने फोफावलेल्या गुन्हेगारी टोळ्यांनी काही वर्षांपूर्वी अवघे शहर वेठीस धरले होते. टोळ्यांवर कारवाई होत असली तरी गुन्हेगारी नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे.  गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलीस गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत तर काही गुंडांवर तडीपारीची कारवाई करीत आहेत. या स्थितीत वर्षांच्या अखेरीस गुन्हेगारीचा आलेख उंचावत आहे.

तिघांच्या हत्येतील पहिली घटना बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अंबडच्या महालक्ष्मीनगर रिक्षा स्टँडवर घडली. अंबड परिसरात राहणारा रिक्षाचालक साहेबराव निंबा जाधवचे (३१) काही महिन्यांपूर्वी संशयित गणेश शिंगटे, प्रवीण शिंगटे, दर्शन दोंदे, किरण निरभवणे, संतोष जाधव यांच्याशी वाद झाले होते. त्यावेळी पोलिसात तक्रारही देण्यात आली होती. या वादाचा राग मनात ठेवून संशयितांनी साहेबरावला अद्दल घडविण्याचे ठरविले. बुधवारी रात्री साहेबराव रिक्षाने घरी परतत असताना संशयितांनी त्याला गाठले. मागील भांडणाची कुरापत काढत त्याच्याशी हुज्जत घातली. यावेळी संशयितांनी लाकडी दांडक्याने त्याच्यावर हल्ला चढविला. यामध्ये साहेबराव गंभीर जखमी झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी साहेबरावला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या घटनेची माहिती समजल्यानंतर मित्र, नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. संशयितांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांवर कारवाईचे आश्वासन देऊन नातेवाईकांची समजूत काढली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील काही संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

दुसरी घटना रात्री साडेअकराच्या सुमारास राजीवनगर परिसरातील झोपडपट्टी भागात घडली. उत्सव समितीच्या कामकाजावरून राजीवनगर झोपडपट्टी परिसरात राहणारे देवीदास इगे, दिनेश बिराजदार यांचा त्यांच्या सोबत त्याच परिसरात राहणारे संशयित कृष्णा शिंदे, दीपक वाळवकर, नितीन पंडित, बबलू डबाळे, अन्य काही युवकांशी वाद झाला होता. या वादातून रात्री झोपडपट्टी परिसरातील १०० फुटी रस्त्यावर इगे आणि बिराजदार यांच्यावर टोळक्याने तीक्ष्ण हत्याराने हल्ला चढविला. त्यात दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर राजीवनगर भागात बंदोबस्त तैनात करण्यात आला. रात्री काही तासांच्या अंतरात खुनाच्या तीन घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एका प्रकरणात संशयितांमध्ये रिक्षाचालकांचा समावेश आहे. रिक्षाचालकांची दादागिरी सर्वश्रुत आहे. कोणालाही ते जुमानत नाही. त्यांच्यामार्फत आता असे प्रकारही घडू लागल्याने नागरिक धास्तावले आहेत.

संशयित ताब्यात

बुधवारी रात्री घडलेल्या घटनांमागे पूर्ववैमनस्य तसेच अंतर्गत वादाची कारणे आहेत. रिक्षाचालकांच्या आपापसातील वादात अंबड येथे रिक्षाचालकाचा, तर उत्सव काळात दोन गटात झालेल्या वादातून राजीवनगर येथे दोन जणांचा खून झाला. याप्रकरणी संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून काहींचा शोध सुरू आहे.

सचिन गोरे (साहाय्यक पोलीस आयुक्त)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Criminal terror in nashik nashik crime