नाशिक : उच्चभ्रू वसाहतीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील कॉलेज रोडवरील पाटील कॉलनी क्रमांक चारमध्ये एका घरातून बेकायदेशीरपणे विक्री होणाऱ्या सिगारेट आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थानी स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय, रात्री उशिरापर्यंत तिथे गर्दी होऊन हाणामारीसारखे प्रकार घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

या संदर्भात दोन महिन्यांपूर्वी रहिवाशांनी गंगापूर पोलीस ठाण्याकडे तक्रार दिली होती. पोलिसांनी संबंधितास तंबी देऊनही परिस्थितीत बदल झालेला नाही. त्यामुळे त्रस्तावलेले रहिवासी आता पोलीस आयुक्तांकडे दाद मागणार आहेत.

मागील काही वर्षांत कॉलेज रोडचे स्वरूप पूर्णत: बदलले आहे. मुख्य रस्त्यासह कॉलनी परिसरात विस्तारलेली खाद्य पदार्थाची दुकाने, टपऱ्या अशी ठिकाणे युवावर्गाला ठिय्या देण्याची केंद्र बनली आहेत. आता हे लोण रहिवासी क्षेत्रातही पसरल्याचे पाटील लेन क्रमांक चारमधील प्रकाराने समोर आले. कॉलनीतील एका भूखंडावरील घरातून सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थाची विक्री केली जाते.

दिवसभर तिथे युवकांचे जथे धूम्रपान करतात. त्यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींचाही समावेश आहे. याचा परिणाम स्थानिक वयस्कर मंडळी आणि लहान मुलांच्या आरोग्यावर होत असल्याकडे स्थानिकांनी लक्ष वेधले.

परिसरात नवनीत, सारस, आशियाना, सोनाई, रजनीगंधा आदी इमारतींमध्ये शेकडो रहिवासी राहतात. त्या सर्वाना हा त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिकांनी संबंधित दुकानचालकास समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. अखेरीस रहिवाशांनी मार्च महिन्यात गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी संबंधितास समज दिल्यानंतर दोन ते तीन दिवस दुकान बंद राहिले. परंतु, नंतर पुन्हा आधीसारखी स्थिती निर्माण झाल्याचे रहिवासी सांगतात. पोलीस अधूनमधून पाहणी करतात. पण, दुकान सुरू आहे. तिथे होणाऱ्या गर्दीमुळे कॉलनी रस्त्यावर रहदारीत अडथळे निर्माण होतात. अल्पवयीन मुले-मुली राजरोस धूम्रपान करतात. त्यातून चुकीचे संदेश जातात. रहिवासी क्षेत्रातील अनधिकृत दुकानाकडे महापालिकेने कानाडोळा केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शांततेला सुरुंग

घरातून चालविले जाणारे दुकान रात्री उशिरापर्यंत सुरू असते. अनेकदा गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये वाद होऊन हाणामारी होते. त्यामुळे परिसरातील शांततेचाही भंग होत आहे. रहिवासी भागातील वातावरण दूषित झाले आहे. या संदर्भात लवकरच पोलीस आयुक्तांची भेट घेऊन दाद मागितली जाणार असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.