जळगाव : उर्स निमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते नागपूर तसेच नागपूर ते नाशिक रोड, या मार्गांवर अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. या विशेष गाड्यांमुळे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई परिसरातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, उर्ससाठी प्रवास करणाऱ्यांसह इतर प्रवाशांनाही अतिरिक्त रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे.
मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, या विशेष गाड्यांच्या प्रत्येकी दोन फेऱ्या होणार असून सर्व गाड्या अनारक्षित स्वरूपाच्या असतील. त्यामुळे आरक्षण न मिळालेल्या किंवा ऐनवेळी प्रवासाचा बेत ठरविणाऱ्या प्रवाशांना या गाड्यांचा मोठा फायदा होणार आहे. उर्सच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी या मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नियमित गाड्यांवरील ताण कमी करण्यासाठी या विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत.
मुंबई ते नागपूर अनारक्षित विशेष गाडी (२ फेऱ्या)
०१०२१ विशेष अनारक्षित गाडी ११ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे ००.३० वाजता सुटेल. आणि त्याच दिवशी दुपारी ३.४५ वाजता नागपूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ०१०२२ विशेष अनारक्षित गाडी १२ जुलै रोजी नागपूर येथून रात्री ९.४० वाजता सुटेल आणि १३ जुलै रोजी दुपारी १.५० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पोहचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
नागपूर ते नाशिक रोड अनारक्षित विशेष गाडी (२ फेऱ्या)
०१२०३ नागपूर ते नाशिक रोड विशेष अनारक्षित गाडी १२ जुलै रोजी नागपूर येथून सायंकाळी ६.१५ वाजता सुटून १३ जुलै रोजी पहाटे ५.३० वाजता नाशिक रोड येथे पोहचेल. परतीची ०१२०४ ही गाडी १३ जुलै रोजी नाशिक रोड येथून सकाळी ७.५० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८ वाजता नागपूर येथे पोहचेल. या गाडीला अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव आणि मनमाड या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भातून नाशिककडे आणि नाशिकहून विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांना या विशेष गाडीची सुविधा उपलब्ध होणार आहे. मध्य रेल्वेने या दोन्ही विशेष गाड्यांसाठी १८ डब्यांची संरचना निश्चित केली असून, त्यामध्ये १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे, दोन सामान्य द्वितीय श्रेणी-सह गार्ड ब्रेक व्हॅनचा समावेश आहे. सर्व डबे अनारक्षित असल्याने सामान्य तिकिटावर प्रवास करता येणार असून, अतिरिक्त प्रवाशांची सोय करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केला आहे.
प्रवाशांनी अनारक्षित तिकीट खरेदीसाठी रेल्वेच्या रेलवन ॲपचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. तसेच या विशेष गाड्यांचे सर्व स्थानकांवरील सविस्तर वेळापत्रक रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच एनटीईएस ॲपवर उपलब्ध असून प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीची वेळ आणि इतर माहिती तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. उर्स निमित्त दरवर्षी होणारी मोठी प्रवासी गर्दी, नियमित गाड्यांमध्ये वाढणारा ताण आणि प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
