जळगाव : राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात मंगळवारी रात्री दोन गटात किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर काही जणांनी तुफान दगडफेक करत भाजीपाला बाजाराजवळील पाच दुकानांची जाळपोळ केली. एका राजकीय व्यक्तीच्या मोटारीला पुढे जाऊ न दिल्यामुळे हा वाद उफाळून आल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी अद्याप त्यास दुजोरा दिलेला नाही. गावात दोन जानेवारीच्या पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मंत्री गुलाबराव मंगळवारी मुंबई येथे होते.
जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात मुख्य रस्त्यावर मंगळवारी रात्री राजकीय व्यक्तीच्या मोटारीला पुढे जाऊ न दिल्यामुळे वादाला सुरूवात झाली. दोन्ही वाहनचालकांमध्ये वाद झाल्यानंतर प्रकरण तेथेच मिटले होते. मात्र, रात्री अकराच्या सुमारास दोन गट ग्रामपंचायतीच्या चौकात समोरासमोर आले. पुन्हा वाद उफाळून आला. त्यानंतर झालेल्या हाणामारीला दंगलीचे स्वरूप प्राप्त झाले. जमावाने दगडफेक करत भाजीपाला बाजाराजवळील मुख्य रस्त्यावर असलेल्या पाच दुकानांना आग लावली. त्यामुळे दुकानांमधील सर्व सामान जळून खाक झाला. आगीच्या घटनेची माहिती मिळताच धरणगाव नगरपालिकेसह जळगाव महानगरपालिका तसेच जैन इरिगेशनचे अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी पोहोचले. अंधारात आग विझविण्यासाठी दुकानांचे कुलूप तोडून आतमध्ये पाण्याचा मारा करण्यात आला. रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळविता आले.
हे ही वाचा… नववर्षाच्या पहाटे नाशिकमध्ये आग; गोदामासह चार घरे भस्मसात, दोन जखमी
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी आणि पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गावात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त पाळधी गावातील ढाब्यांवर पार्टीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र, दंगलीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. महामार्गावरील सर्व ढाबे पोलिसांनी तत्काळ बंद केले. रात्री उशिरापर्यंत दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांनी सुरक्षेची जबाबदारी सांभाळत गस्त सुरु ठेवली होती. याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून दोन जानेवारीच्या पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती धरणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक पवन देसले यांनी दिली. पाळधी गावात दंगलीनंतर भीतीचे वातावरण असून, नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.