मालेगाव : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय भूकंपामुळे सर्वाच्याच भुवया उंचावल्या गेल्या. कोणते आणि किती आमदार शिंदे यांच्या बंडात सामील झाले आहेत, सरकार पडणार की काय, याविषयीची चिंता सकाळपासून शिवसैनिकांना सतावत असल्याचे दिसले.
याच काळजीतून कृषिमंत्री दादा भुसे हे नेमके कुणीकडे आहेत, हे जाणून घेण्यासाठी मालेगावमधील शिवसैनिकांनी त्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नव्हता. त्याच वेळी भुसे हे नॉट रिचेबल असल्याचे दूरचित्रवाहिन्यांच्या बातम्यांमध्ये सांगितले गेल्यानंतर शिवसैनिकांच्या काळजीत आणखी भर पडत होती. अखेरीस दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षां बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीस भुसे हे उपस्थित असल्याचे दृश्य बघितल्यावर अनेकांना हायसे वाटले.




भुसे आणि सेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे फार पूर्वीपासून सलोख्याचे संबंध आहेत. ठाणे जिल्ह्यात पाटबंधारे खात्याच्या नोकरीस असताना धर्मवीर आनंद दिघे यांच्या संपर्कात आल्यानंतर भुसे हे त्यांचे चाहते बनले. नंतर नोकरीचा राजीनामा दिल्यावर समाजकारण आणि राजकारण करीत असताना ते दिघे यांच्या आणखी जवळ गेले. दिघे यांच्यासोबत काम करीत असताना शिंदे, भुसे आणि ठाण्याचे विद्यमान खासदार राजन विचारे या तिघांची मैत्री आणखी घट्ट होत गेली.
खासदार विचारे हे अलीकडेच भुसे यांचे व्याहीही बनले आहेत. भुसे यांचा शिंदे यांच्याशी जसा दोस्ताना आहे, त्याचप्रमाणे मातोश्रीशीही त्यांचे अत्यंत जिव्हाळय़ाचे संबंध आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय व विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. हा विश्वास सार्थ करण्यासाठीच कृषीसारख्या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. त्यामुळे शिंदे यांच्या बंडानंतर भुसे यांची भूमिका काय असेल, याची अनेकांना उत्सुकता होती. मात्र मंगळवारी वर्षां या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या आमदारांच्या बैठकीत भुसे हे उपस्थित असल्याचे उघड झाल्यानंतर अन्य चर्चाना विराम मिळाला.